
स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाला. दादरच्या शिवाजी पार्कवरील पुतळ्याजवळ ही घटना घडली आहे. काल (16 सप्टेंबर) रात्री कोणीतरी हा लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हा लाल रंग नेमका कोणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचं 1995 साली निधन झालं होतं. त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटासह शिवसेना शिंदे गटाने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. सदर घटनेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ दाखल झाले आहेत.
राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरेंचा पुतळा असलेल्या परिसरात जी घटना घडली आहे, त्याची संपूर्ण माहिती घेतली आहे. या परिसरात नेमके काय काय घडले आणि आतापर्यंत पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आलीय, याची संपूर्ण माहिती राज ठाकरेंनी घेतली.
राज ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मनसे सचिव सचिन मोर यांनी घटनास्थळी येऊन आढावा घेतला. त्यानंतर सर्व घटनाक्रम राज ठाकरे यांना सांगण्यात आला. यानंतर राज ठाकरे मीनाताईंच्या पुतळ्याजवळ दाखल झाले आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शाखाप्रमुखांच्या बैठकीआधी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आधीच आपल्या नेत्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या ठिकाणी काय झालं, याची माहिती घेतली आहे.
कोणीतरी सकाळच्या सुमारास मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या जवळ लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला आहे घटनास्थळी शिवसैनिक जमले आहेत. काही शिवसैनिक पुतळ्याच्या आजूबाजूची साफसफाई करताना दिसून येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच तातडीने या ठिकाणच्या स्थानिक आमदार, खासदार, काही शिवसैनिक परिसरात दाखल झाले.
जमलेल्या शिवसैनिकांनी साफसफाई सुरू केले. पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. सकाळी त्या आधी असं काहीच नव्हतं. आजूबाजूचा लाल रंग शिवसैनिकांनी पुसून काढला आहे. शिवसैनिकाने आजूबाजूचा लाल रंग पुसत साफसफाई केली.