शिर्डी (प्रतिनिधी) —
प्रवचनकार पं. प्रदीप मिश्रा यांच्या स्वागतावेळी झालेल्या एका कृतीने साईनगरीत संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. मिश्रा यांनी आपल्या स्वागत मिरवणुकीदरम्यान साईबाबांच्या समाधी मंदिराजवळून जातानाही दर्शन न घेता थेट कार्यक्रमस्थळी गेल्याने, साईभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
या प्रकरणाने परवा पासून सोशल मीडियावर संतप्त चर्चा रंगल्या असून, साईनगरीतील नागरिक आणि साईभक्तांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांनी पहिल्यांदा ह्या विषयावर आवाज उठवला. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरून पोस्ट टाकत म्हटले की —
“साईबाबा हे शिर्डीचे प्राण आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायला कोणी टाळत असेल, तर तो शिर्डीत येण्यास पात्र नाही.”
DN SPORTS
या पार्श्वभूमीवर शिर्डीतील ज्येष्ठ नेते चंद्रकांत गोंदकर यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी दैनिक साईदर्शनशी बोलताना म्हटले —
“जो आमच्या साईबाबांना मानीत नाही, त्याला आम्ही का मानावे!
साईबाबा हे देशाचे दैवत आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, देशभरातील संत आणि महंतसुद्धा त्यांच्या चरणी नतमस्तक होतात. मग प्रदीप मिश्रा कोण आहेत, जे साईबाबांचे दर्शन न करता निघून गेले? ही केवळ अवमानाची नव्हे, तर श्रद्धेवर घाव घालणारी बाब आहे.”
शिर्डीतील काही स्थानिक नागरिकांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले की, “शिर्डीमध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती भक्तिभावाने साईंचे दर्शन घेतो. साईबाबांचे नाव न घेता येथे येणे म्हणजे आत्म्याशिवाय देहासारखे आहे.”
🔹 भक्तांमध्ये संभ्रम आणि रोष
प्रदीप मिश्रा यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 48 तास उलटूनही त्यांच्याकडून न बोलल्याने भक्तांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढला आहे. अनेक भक्त म्हणत आहेत —
“जर मिश्रा यांनी साईबाबांना मान नाही दिला, तर त्यांनी शिर्डीत येण्याची गरजच काय होती?”
अनेक स्थानिकांनी त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.