शिर्डी — श्री साईबाबांच्या पुण्यभूमीत कधी नव्हे इतकी कमी भाविकांची गर्दी दसरा अर्थात श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला झाली होती. एकेकाळी भाविकांच्या गर्दीने फुलून जाणारी ही पवित्र नगरी आज शांत दिसते आहे. गेल्या एक वर्षांपासून शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने घटताना दिसत आहे.
😔 व्यापाऱ्यांमध्ये आर्थिक संकटाची छाया
या घसरणीमुळे हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंट, नॉव्हेल्टी, ट्रॅव्हल्स आणि छोटे-मोठे व्यावसायिक मोठ्या चिंतेत आहेत. बँकांचे कर्जहप्ते, वीजबिल, पाणीपट्टी, घरपट्टी — हे सर्व भरणे कठीण झाले आहे.
शिर्डीत कधी नव्हे इतके मोठे आर्थिक संकट व्यापाऱ्यांवर कोसळले आहे. “भाविक नाहीत म्हणजे व्यवसाय नाही,” ही कटू वस्तुस्थिती आज प्रत्येकाच्या ओठावर आहे.
📉 भाविकांच्या घटतीमागील कारणांची मालिका
या संकटामागे अनेक कारणे दिसून येतात. काही दिवसांपासून सोशल मीडियावर साईबाबांबद्दल सुरू असलेली बदनामी, तसेच विविध अफवा यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. देश-विदेशात या बातम्या वेगाने व्हायरल झाल्याने अनेक भाविकांचा शिर्डीकडे येण्याचा ओघ थांबला आहे.
त्यातच काही गुन्हेगारी घटना, भाविकांसाठी अपुरी पार्किंग व्यवस्था, अपूर्ण रस्ते, तसेच नगर–मनमाड रस्त्याची दुरवस्था ही कारणे देखील गर्दी घटण्यास कारणीभूत ठरली आहेत.
समृद्धी महामार्गामुळे भाविक दर्शन घेऊन त्वरित परतीचा प्रवास करत आहेत, तर शिर्डीत मनोरंजन व विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा नसल्याने दीर्घ मुक्काम कमी झाला आहे.
🏛️ प्रशासन व संस्थानकडे दुर्लक्ष?
या परिस्थितीला जबाबदार म्हणून साई संस्थान प्रशासन, शिर्डी नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्याकडे बोटे उठवली जात आहेत.
आजवर भाविकांच्या गरजा, त्यांच्या अडचणी आणि व्यावसायिकांच्या समस्यांवर कोणतीही संयुक्त बैठक किंवा संवाद साधला गेलेला नाही.
हॉटेल असोसिएशनची भूमिकादेखील महत्वाची आहे; मात्र सर्वांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवतो.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे व्यापारी वर्गाने ही गंभीर बाब लक्षात आणून देणे अत्यंत आवश्यक आहे.
🙏 आत्मचिंतनाची वेळ – साईभक्तांवरच आपली रोजीरोटी
शिर्डीत येणारा प्रत्येक भाविक हा दुसरा साईबाबाच आहे. त्याच्याच कृपेवर आपली रोजीरोटी, रोजगार आणि शहराचा अर्थकारण टिकले आहे.
म्हणूनच भाविकांचा ओघ परत मिळवण्यासाठी प्रशासनाने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत.
विशेष म्हणजे, दरवर्षी संस्थान प्रशासन देणगीची मोजणी आणि पत्रकार परिषदेत आकडेवारी जाहीर करत असते. पण यंदा तसे झाले नाही — कारण देणगीची रक्कम फारच कमी जमा झाली असल्याचे समजते.
ही परिस्थिती आपल्याला आत्मपरीक्षणाचा धडा देते.
दिवाळी उत्सवात तरी पुन्हा भाविकांची गर्दी वाढो, शिर्डी पुन्हा उजळो आणि आमच्या सर्व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलो —
हीच साईनाथ चरणी प्रार्थना. जेष्ठ पत्रकार : राजेंद्र भुजबळ