
आजकाल साई मंदिरात मंत्री, नेते, व्हीआयपी, सेलिब्रिटी, देणगीदार,तसेच मार्जितील व्हीआयपी यांच्या सोबत साईराम करणारी मंडळी तर संस्थांनचे अधिकारी, कर्मचारी अनेकवेळा मिरवताना दिसतात तर त्यांचे फोटोसेशन सुद्धा केले जाते. परंतु आता स्वार्थातून परमार्थ साधण्याची नवीन परंपरा सध्या मंदिरात सुरु झाली असून त्याचा अतिरेक दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्याचंच उदाहरण आम्ही मांडलं आहे. हो वरील चित्रातील तीन माकडासारखी अवस्था साई संस्थान प्रशासनाची झाली आहे,
बोगस पास, बोगस देणगी पावत्या, लाखो रुपये किंमतीच्या सामानांची चोरी, भाविकांकडून महागडे गिफ्ट, पैसे त्या मोबदल्यात भाविकांची दर्शन व्यवस्था,वेटिंग रूममध्ये चहा पाण्याची व्यवस्था अगदी चोखपणे काही मंडळी करताना पहातो तर त्या मोबदल्यात त्याच भाविकांच्या पैशातून देश विदेशातील कौटुंबिक सहली, पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्ट्या याचे लाभार्थी नुसते
संस्थान अधिकारी, कर्मचारी नाही तर गावातील काही लालची लोक पण आहे. हेच लाभार्थी मार्जितील भाविकांची दर्शनाची, आरतीची व्हीआयपी व्यवस्था तर करतात तर काही महाभाग तीन नंबर गेटवर एमएसएफ, संस्थान सुरक्षा रक्षक यांच्याशी मिलिभगत करून कोडवर्ड द्वारे भाविकांकडून पैसे घेतात व शेकडो बोगस लोक बोगस नातेवाईक असल्याचे सांगून फुकटचे दर्शन घडवून आणतात.
यात बोगस आधारकार्डचा सर्वात मोठा वापर होत आहे,हे सर्व आम्ही उघड्या डोळ्याने बघतो, मात्र याला विरोध कोण करणार? केला तरी त्याची दखल कोण घेणार? असे एक ना अनेक प्रश्न आम्हाला भेडसावत आहे,तक्रार केली तरी त्याला केराची टोपली दाखविली जाते. हे सहन करण्याची आम्हाला जनुकाही सवय झाली असं वाटत आहे
हे होत असताना आज गावची अवस्था वरील तीन माकडासारखी झाली आहे, मला काय त्याचं! असं म्हणून आम्ही दुर्लक्ष करत आहे, परिणामी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची भीती सुद्धा या साईराम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, सुरक्षा रक्षकांना तसेच एजेंट लोकांना वाटत नाही हे विशेष.
या सर्वं बाबींची कल्पना सर्वं प्रशासनाला आहे मात्र केवळ शेतात पडलेल्या पावटीप्रमाणे प्रत्येकजण त्यावरून चालत आहे.आता कुणाला काय मिळते, कोण कुठे विमानाने गोव्याला, परदेशात तसेच अनेक मोठ्या पर्यटनस्थळी जातो, कुणाबरोबर जातो हे काही लपून राहिलं नाही बरं का!
मात्र याची अनेक अधिकारी, कर्मचारी यांना इतकी सवय झाली आहे कि त्यातून ते बाहेर निघूच शकत नाही याचं मुख्य कारण म्हणजे शिस्त, वचक, कारवाई, वेळोवेळी तक्रारीची तपासणी,गावकरी गेटचे रजिस्टर तपासणी हे ज्यांचे काम आहे तेच यांसर्वांना सामील असल्याचे आरोप होत आहे.
आजरोजी यांच प्रमाण वाढतच चाललं असून, भाविक मात्र भरडला जात आहे, देणगीच प्रमाण कमी झालं आहे, येथील बाजारपेठा आर्थिक संकटात सापडल्या आहेत, गुन्हेगारी वाढली आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी कोणतीही ग्रामसभा झाली नाही, कोणतेही शिष्टमंडळ पुढं येत नाही.
अर्थात आज आमच्या बाबांच्या नगरीतील आमची अवस्था वरील तीन माकडासारखी झाली आहे अर्थात बुरा मत देखो! बुरा मत सुनो!! बुरा मत बोलो!!!
याचाच गैरफायदा काही मंडळी घेत असून यामुळेच साई संस्थान व शिर्डीची बदनामी होत आहे तर ग्रामीण भागातील सर्वाना पटणारी म्हणीचा प्रत्येय येत असून ती म्हणजेच वरमाई जर बाजारात मिरवू लागली तर वऱ्हाडाची काय कथा! हेच आजच खरं वास्तव आणि एक कटुसत्य आहे.