
*चॅप्टर केसेसवर ऐतिहासिक कारवाई : १६ सराईत गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघाचौरे यांनी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकारांचा पहिल्यांदाच प्रभावी वापर**
अहिल्यानगर / श्रीरामपूर –
महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित झाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर विभाग श्री. सोमनाथ वाघाचौरे यांनी पहिल्यांदाच अत्यंत मोठ्या आणि राज्यात क्वचितच पाहायला मिळेल अशा प्रभावी कायदेशीर कारवाईचा अवलंब केला आहे. चॅप्टर केसेसअंतर्गत ५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध सुनावणी घेऊन तब्बल १६ गैरअर्जदार / प्रतिवादींना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे.
ही कारवाई आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात असून, नवीन कायद्यानुसार कार्यकारी दंडाधिकारी पदाच्या अधिकारांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच वापर झाला, असे स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मान्य केले आहे.
कार्यकारी दंडाधिकारी म्हणून न्यायिक अधिकारांचा प्रभावी वापर
दिनांक २८ जून २०२४ च्या शासकीय अधिसूचनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२६, १२७, १२८, १२९ तसेच कलम १६३ अंतर्गत बंधपत्र, उल्लंघन, जामीनदार वैधता, प्रवेशबंदी आदी कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
याच अधिकारांचा वापर करून अप्पर पोलीस अधीक्षक वाघाचौरे यांनी—
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची सुनावणी केली,
योग्य जामीनदार न आणणाऱ्यांची कोठडी निश्चित केली,
बंधपत्र मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली,
आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवू पाहणाऱ्यांना थेट न्यायालयीन कोठडीचा मार्ग दाखवला.
१६ गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी – स्टेशननिहाय आकडेवारी
हददीतील विविध पोलिस ठाण्यांनी प्रस्ताव पाठविल्यानंतर झालेल्या सुनावणीअंती पुढील प्रमाणे गुन्हेगार कोठडीत धाडण्यात आले—
अ. क्र. पोलीस स्टेशन संख्या
1 श्रीरामपूर शहर 4
2 संगमनेर शहर 3
3 कोपरगाव शहर 3
4 लोणी 3
5 राहुरी 2
— एकूण 16
काही गुन्हेगारांनी जामीनदार न आणल्याने, काहींनी बंधपत्र मोडल्याने कारवाई
सुनावणीदरम्यान असे आढळले की—
काही गैरअर्जदार योग्य जामीनदार हजर करू शकले नाहीत,
तर काहींनी याआधी केलेल्या बंधपत्राचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून पुन्हा गुन्हे केले होते.
बंधपत्र हा कायद्यानुसार दिला जाणारा “चांगल्या वर्तनाचा करार” असल्याने त्याचा भंग करणाऱ्यांवर कारवाई बंधनकारक ठरते. या नियमाचे काटेकोर पालन करतच १६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांचा आदेश – ५ पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सर्वांना चॅप्टर केसेस
मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री. सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील सर्व ठाण्यांना आदेश दिले होते की—
“५ पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारांची तातडीने चॅप्टर केसेस १२९ अन्वये कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे सादर करावीत.”
त्याअनुसार—
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे श्रीरामपूर
जयदत्त भवर (SDPO श्रीरामपूर)
कुणाल सोनवणे (SDPO संगमनेर)
अमोल भारती (SDPO शिर्डी)
यांनी स्वतः देखरेख करून त्यांच्या हद्दीतील स्टेशनकडून प्रस्ताव सादर केले.
जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण
अप्पर पोलीस अधीक्षक वाघाचौरे यांनी घेतलेल्या या मोठ्या कारवाईमुळे—
गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,
निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई मोठे पाऊल ठरत आहे.
स्थानिक नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत करत राय दिली आहे की,
“अशा कडक निर्णयांची जिल्ह्याला आज अत्यंत गरज आहे.”
राज्यातील पहिली मोठी कारवाई – अधिकारीही थक्क
या प्रकारे नवीन कायदेशीर अधिकारांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि कठोरपणे वापर करणारी राज्यातील ही पहिलीच आणि सर्वाधिक प्रभावी कारवाई असल्याचे स्वतः पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही नमूद केले आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघाचौरे यांनी दाखवलेली ही कार्यपद्धती जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी एक “गेम चेंजर” ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.