
राहाता | प्रतिनिधी
राहाता शहराजवळील श्री भगवान महावीर स्वामी जैन मंदिर व श्री सुमतीनाथ जैन मंदिर परिसरात मध्यरात्री मोठा दरोड्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. डॉ. राजेंद्र पिपाडा व त्यांच्या अंगरक्षकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून मंदिरातील दानपेटी सुरक्षित राहिली आहे.
अंगरक्षकाच्या धाडसामुळे डाव हाणून पाडला
मिळालेल्या माहितीनुसार, चार अज्ञात दरोडेखोरांनी पहाटे सुमारे ३ वाजताच्या सुमारास मंदिर परिसरात प्रवेश करून दरवाजाची फळी कटरने उचकली व मागील बाजूचे तार-कंपाउंड कापले. दानपेटी चोरण्याचा त्यांचा प्रयत्न असताना अंगरक्षक शैलेश मोहन भोयर यांनी तत्परतेने धाव घेतली.
“कोण आहे?” अशी जोरदार हाक दिल्यानंतर एका संशयिताने लोखंडी रॉडने हल्ल्याचा प्रयत्न केला; मात्र अंगरक्षकांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार केला. गोंधळ उडताच चौघेही संशयित मंदिराच्या मागील बाजूने पळून गेले.
पुजाऱ्याला बाहेरून कडी; मोठा कट उघड
घटनेदरम्यान मंदिराचे पुजारी विनायक देशपांडे यांच्या घराची कडी बाहेरून लावल्याचे उघड झाले. यावरून चोरीचा पूर्वनियोजित कट असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दरवाजाचे नुकसान झाले असले तरी दानपेटी व इतर साहित्य सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांचा मोठा फौजफाटा; LCB, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पो.नि. रणजित गलांडे, राहाता पो.नि. नितीन चव्हाण तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी तात्काळ हालचाली केल्या. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथक, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू असून परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
“अफवा पसरवू नका; सतर्क रहा” — डॉ. पिपाडा
डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की,
संशयास्पद हालचाल दिसताच तात्काळ पोलिसांना कळवा.
मंदिर व सार्वजनिक ठिकाणी CCTV, सुरक्षा रक्षक व प्रकाशव्यवस्था सक्षम ठेवा.
सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती/अफवा पसरवू नका.
पोलिस तपासात सहकार्य करा.
गुन्हा दाखल; आरोपींचा शोध सुरू
अंगरक्षक शैलेश मोहन भोयर यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात चार अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत असून, परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू आहे.
मंदिर सुरक्षित; पण सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
या घटनेमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून, कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांचा संतप्त सवाल
एक अंगरक्षक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मध्यरात्री धाडसाने चोरट्यांसमोर उभा राहू शकतो, तर राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस काय करत होते?
राहाता शहरात घडलेल्या मंदिर दरोड्याच्या प्रयत्नानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “एकट्या अंगरक्षकाने चार संशयितांना पळवून लावले, तर स्थानिक पोलीस यंत्रणा कुठे होती?” असा थेट सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
काही नागरिकांमध्ये तर कुजबुज सुरू आहे —
धार्मिक स्थळांवर हल्ल्याचे प्रयत्न होतात, पुजाऱ्यांच्या घराला बाहेरून कडी लावली जाते, मंदिराची फळी कटरने उचकली जाते… आणि तरीही जर गुन्हेगार निर्धास्तपणे ये-जा करत असतील, तर गस्त व्यवस्था, गुप्त माहिती जाळे आणि स्थानिक पोलिसांची सतर्कता यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का?
राहाता येथील नागरिक आता स्पष्ट मागणी करत आहेत —
रात्रीची गस्त वाढवावी
धार्मिक स्थळांना विशेष सुरक्षा द्यावी
संशयितांचा तात्काळ शोध लावावा
जबाबदारी निश्चित करावी
धाडसी अंगरक्षकाने दाखवलेली हिंमत कौतुकास्पद असली तरी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची प्राथमिक जबाबदारी पोलीस प्रशासनाचीच आहे, हे विसरून चालणार नाही.

