
शिर्डी शहराला हादरवून टाकणारी अत्यंत धक्कादायक व गंभीर घटना समोर आली असून, शिर्डी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले साई नंदादीप हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर काही काळ साई नंदादीप हॉटेल परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते,
मृत तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर (वय अंदाजे २२ वर्षे) असे असून तो मूळचा संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. रोजगारासाठी तो शिर्डीत आला होता व सध्या राहता तालुक्यातील गणेशनगर येथे वास्तव्यास होता. विशाल हा शिर्डीतील साई नंदादीप हॉटेलमध्ये कामगार म्हणून प्रामाणिकपणे काम करत होता, अशी माहिती समोर येत आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, काल दुपारपासून संबंधित हॉटेलमधील एका खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आले. बराच वेळ उलटूनही दरवाजा न उघडल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने व्यवस्थापनाची चिंता वाढली. अखेर संशय बळावल्याने तात्काळ शिर्डी पोलिसांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सिंघम सागर काळे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचांच्या उपस्थितीत दरवाजा उघडण्यात आला असता, विशाल वायकर याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हे दृश्य पाहून उपस्थितांची मने सुन्न झाली.
पोलिसांनी घटनास्थळी सखोल पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी राहात येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली आहे का, मोबाईलमध्ये काही संदेश, कॉल रेकॉर्ड किंवा मानसिक तणावाची कारणे आहेत का, याचा पोलिसांकडून बारकाईने तपास सुरू आहे.
विशालने टोकाचे पाऊल उचलण्यामागे कामाचा ताण, वैयक्तिक अडचणी, आर्थिक समस्या की अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मृत तरुणाच्या नातेवाइकांना घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांच्या जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, शिर्डी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. तरुण वयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून, तपासाअंती काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

