आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, अशा शब्दांत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले. तब्बल दोन दशकांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर आले. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी बाळासाहेबांना जे जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं, आम्हाला सोबत आणलं,

अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. वरळीतील एनएससीआय डोममध्ये झालेल्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधूंची भाषण झाली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केवळ दोनच खुर्च्या होत्या. ठाकरे बंधूंसाठी या खुर्च्यांची मांडणी करण्यात आली होती.
हिंदी भाषा सक्तीवरुन उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले. ‘आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय. भाषेवरुन जेव्हा एखादा विषय निघतो, त्यावेळी तो वरवरचा धरुन चालणार नाही. मध्यंतरीच्या काळात आपण सर्वांनीच या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि सोडून द्यायचं.
आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. डोक्यावर शिवसेना प्रमुखांचा हात नसता, तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होतं?’ असा सवाल करत उद्धव यांनी भाजपला लक्ष्य केलं.ठाकरे बंधू एकत्र येणार…हा खरं तर तितकाच महत्त्वाचा दिवस, महत्त्वाचा क्षण , त्यामुळं त्या दोघांची एन्ट्री कशी होणार, याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
तशी ठाकरे बंधूंची ग्रॅन्ड एन्ट्री झालीच. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एन्ट्रीला एक खास गाणं वाजलं. कोण आला रे, कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला. आपले साहेब ठाकरे ठाकरे… हे ‘ठाकरे’ चित्रपटातील गाणं वाजलं आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सोशल मीडियावर हा गाणं चर्चेत आलंय.भोंदूबाबा-महाराज व्यस्त असतील,
कोणी टाचण्या टोचतंय, कोणी अंगारे धुपारे करतंय, कोणी रेडे कापतंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. या नतद्रष्टांचा अनुभव घेतला, वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. डोक्यावर बाळासाहेबांचं छत्र नसतं तर काय केलं असतं?