शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे पाचच दिवस शिल्लक असतानाही, शहरात राजकीय हालचालींऐवजी अवघड शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीचा माहोल असताना जिथे प्रत्येक गल्लीबोळात चर्चा, उमेदवारांची धावपळ, पोस्टरबाजी आणि गडबड दिसायला हवी होती, तिथे सध्या प्रचंड संयम आणि संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे.
या शांततेमागील कारण म्हणजे महायुतीतील अंतर्गत नियमावली, महाविकास आघाडीची तयारी, आणि काही स्वतंत्र इच्छुक नेत्यांची अनिश्चित भूमिका.
🔸 भाजपमध्ये गोंधळ, पण शिस्तही! डॉ. सुजय विखे पाटील यांचे कठोर नियम आणि स्पष्ट संदेश!
महायुतीच्या छावणीत विशेषतः भाजपच्या गोटात टेन्शनची पातळी सर्वोच्च झाली आहे. कारण, डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी उमेदवारीसाठी घेतलेला कठोर पण पारदर्शक निर्णयप्रक्रियेचा मार्ग सर्वांना धक्का देणारा ठरला आहे.
त्यांनी दिलेल्या स्पष्ट सूचना —
“कोणीही उमेदवारीसाठी मला फोन करायचा नाही.
कोणीही वैयक्तिक भेट द्यायची नाही.
अर्ज सुकानू समितीमार्फतच दाखल व्हावेत.
नियम मोडणाऱ्याचा थेट पत्ता कट!”
या संदेशाने शेकडो इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणारे काही जुने कार्यकर्ते ‘या वेळेस आपलं नाव येईल का?’ या प्रश्नातच अडकले आहेत.
शिर्डीतील राजकारणात पहिल्यांदाच नियमन आणि पारदर्शकतेचा हा इतका कडक नमुना पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही जण नाराज असले तरी, अनेक नागरिक मात्र या निर्णयाचे स्वागत करत आहेत.
🔹 ‘भयाण शांतते’च्या आड सुरु आहेत गुप्त हालचाली; राजकारण ‘व्हॉट्सअॅप कॉल’वर!
या सर्व गोंधळात सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे — गुप्त संवाद!
रेकॉर्डिंगच्या भीतीने अनेक उमेदवार आता फोनऐवजी फक्त व्हॉट्सअॅप कॉल चाच वापर करत आहेत.
अनेक ठिकाणी ‘भेट घेऊ नका, ऐकले जाईल’ अशी सावधगिरी बाळगली जात आहे.
वरिष्ठ नेते शांत असले तरी, कनिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते फुल टेन्शन मोड मध्ये आहेत.
“दादा उमेदवारीचा ग्रीन सिग्नल कधी देणार?”
हा एकच प्रश्न सध्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात घुमत आहे.
अर्ज सादर करताना लागणारी कागदपत्रं, शासनाच्या अटी, सूचक व अनुमोदकांची पूर्तता या प्रक्रियेसाठी भरपूर वेळ लागणार असताना, फक्त चारच दिवस उरले आहेत. त्यामुळे अनेक कार्यकर्ते म्हणतात —
“अशी स्थिती तर ऑक्सिजनवर जगणाऱ्याची झाली आहे!”
🔸 आघाड्यांमध्येही गोंधळ, परंतु राजकीय समीकरणं बदलण्याच्या हालचाली गुप्तपणे सुरू!
महाविकास आघाडी असो वा बाबू पुरोहित यांची तिसरी आघाडी — सर्वत्रच उमेदवारीचा ताण वाढलेला आहे.
तरीदेखील, महाविकास आघाडी आणि पुरोहित गट एकत्र येऊन विखे पाटील गटाला शह देण्याची रणनीती आखत आहेत, अशी कुजबुज ऐकायला मिळते.
गावातील राजकीय वातावरणात आता एकच प्रश्न चर्चेत आहे —
“अंतिम निर्णय कोण घेणार? आणि केव्हा घेणार?”
एकंदरीतच, शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचे चित्र अजूनही धूसर आहे. पुढील दोन दिवसांत नेमकं काय घडतं आणि काय बिघडतं — हेच संपूर्ण शिर्डी तालुक्याच्या राजकीय तापमानावर परिणाम करणार आहे.
🌿 शिर्डीच्या राजकारणातील ही “भयाण शांतता” — अनेकांचा श्वास रोखून धरते आहे. पुढील काही तासांतच या शांततेला राजकीय वादळाचे रूप येणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
🖊️ – पत्रकार राजेंद्र भुजबळ,