उक्कडगाव येथील श्री . रेणुका देवी मंदिर ट्रस्टचे अपहार व धर्मादाय उप – आयुक्त कार्यालयाच्या दस्ताच्या बनावटीकरण करणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील श्री रेणुका देवी मंदिराच्या ट्रस्टच्या पैशाचा ,सोन्या-चांदीच्या वस्तू व इतर मालमत्तेचा अपहार करून धर्मादाय उप आयुक्त कार्यालयातील परिशिष्ट 1 चे बनावटीकरण दस्तऐवज केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा रजि. क्र. ०२४१/२०२४ हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी १) निवृत्ती रंगनाथ शिंदे, २) अशोक गंगाराम शिंदे, ३) लुखाजी सावळेराम शिंदे, ४) सोपान कारभारी शिंदे,
५) बाळासाहेब शंकर शिंदे, ६) नंदू अशोक शिंदे, ७) देविदास लुखाजी शिंदे, ८) बाळासाहेब कारभारी शिंदे, ९) प्रकाश लक्ष्मण शिंदे, १०) विजय बबन शिंदे, ११) शिवाजी आण्णासाहेब लावरे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज कोपरगाव येथील मा. अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केला होता.
सदरचा जामीन अर्ज मा. सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील श्री. रेणुका देवीचे जागृत देवस्थान आहे. गुन्ह्यातील आरोपींनी श्री. रेणुका देवी मंदिर ट्रस्टच्या पैशांचा, सोन्या – चांदीच्या वस्तूंचा अपहार व धर्मदाय उप – आयुक्त कार्यालयाच्या परिशिष्ट १च्या दस्ताचे बनावटीकरण केले होते.
त्यामुळे कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपींनी कोपरगाव येथील मा. सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता आरोपींचा जामीन अर्ज मा. सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच सदर मंदिर ट्रस्टला अध्यक्ष, सचिव आदी कुठलेही पदाधिकारी नसताना,
सदर ट्रस्टचे कायदेशीर विश्वस्त कोण आहेत याचा बोध धर्मादाय उप-आयुक्त कार्यालय अहमदनगर यांनाच होत नाही. असे असताना सदर लोक हे श्री. रेणुका देवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी असल्याचे भासवून भाविकांच्या श्रद्धेचा गैर फायदा घेवून भाविकांचे पैसे, सोन्या – चांदीच्या वस्तू याचा अपहार करायचे तसेच आरोपींनी श्री. रेणुका देवी मंदिर जीर्णोद्धार बांधकामाच्या नावाखाली बेकायदेशीर निधी गोळा करीत आहे.
श्री. रेणुका देवी मंदिराचे बांधकाम हे शासनाची परवानगी बंधनकारक असताना विनापरवानगी बेकायदेशीर कोपरगाव – वैजापूर राज्य मार्ग ६५ च्या ४०मीटर हद्दीत अतिक्रमणात सुरू आहे. म्हणून उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगाव यांनी सदरच्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने नोटीस दिलेल्या आहेत. तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर
यांनी तसेच तहसीलदार कोपरगाव यांनी व शासनाच्या संबंधित इतर विभागांनी मंदिराचे बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण काढून टाकने कामी सहायक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगाव यांना पत्र दिले आहे. अशी परिस्थिती असताना मंदिर बांधकामासाठी मदत निधी व त्यासाठी देणगी पावत्या फाडणे बेकायदेशीर असतांना तसेच हे आरोपी पदाधिकारी नसतांना भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेवून निधी गोळा करीत आहे.
तसेच मंदिरातील दानपेट्या धर्मादाय उप – आयुक्त कार्यालयाकडून सील करण्यात आल्या आहेत. भाविकांनीही सोन्या – चांदीच्या वस्तू येथे रोख न देता, पावती न फाडता दानपेटीतच दान टाकावे अशी नोटीस मंदिराचे परिसरात भाविकांची फसवणूक होवू नये म्हणून पोलिसांनी लावलेली आहे. त्यामुळे फसवणूक होवू नये म्हणून भाविकांनी दान पेटीतच दान टाकावे असे आवाहन ॲड. वैभव रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात शेवटी म्हटले आहे.
