
शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने चार शेतकऱ्यांच्या दुदैवी मृत्यू झाल्याची मोठी घटना चंद्रपुरात घडली आहे. तुटलेल्या विद्युत तारांमुळे विजेचा धक्का लागल्याची माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर येथे ही दुर्दैवी घटना घडली.
पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे, नानाजी राऊत अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. तर या घटनेत सचिन नन्नावरे हा शेतकरी गंभीर जखमी आहे.
उपचारासाठी त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.ब्रम्हपुरी येथून २० किमी अंतरावर असलेल्या गणेशपूर परिसरात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला होता.
या वादळात विद्युत तारा तुटल्या होत्या. तारा तुटून त्या शेतात पडल्या होत्या. त्याच तारांचा धक्का लागल्याने या विद्युत तारांनी घात केल्याचे बोलले जात आहे. महावितरणचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचल्यावर पडून असलेल्या तारांना विद्युत प्रवाह सुरू होता का याचा उलगडा होणार आहे.
सध्या या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शेतात पडलेल्या तारांना विद्युत प्रवाह सुरू होता का? यावर पोलीस आधी तपास करत आहेत.