

सर्वंधर्म समभावाचं प्रतीक असणाऱ्या साईंच्या नगरीत दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात,शुक्रवारी राजस्थान बॉर्डर वरील रतलाम येथून आशिष जैन नावाचे भाविक एकटेच शिर्डीत आले. आपल्या आईने त्यांना शिर्डीला जाऊन बाबांचे आशीर्वाद घेण्याचे सांगितले, आईच्या इच्छेनुसार ते साई दर्शनासाठी शिर्डीत आले होते.
वास्तविक आशिष जैन हे नित्यानियमाने दर पौर्णिमेला शिर्डीत येऊन दर्शन घेत होते. परंतु तीन महिन्यांपासून ते शिर्डीत गेले नसल्याने त्यांच्या आईने त्यांना शिर्डीला जाण्यास सांगितले. शुक्रवारी जैन यांनी शिर्डीतील हैदरभाई पठाण यांच्या लॉजिंगवर रूम घेतला व साई समाधी दर्शनाला गेले.
मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने त्यांनी तो रूमवरच ठेवला होता, दर्शन झाल्यावर ते रूमवर आल्यावर त्यांनी मोबाईल चालू केला व त्यावर घरचे वीस मिसकॉल आलेले होते, ज्यावेळी त्यांनी रीडायल केला त्यावेळी त्यांच्या पत्नीने आईचा वीस मिनिटांपूर्वी देहांत झाला आहे असे सांगितले हे ऐकून ते रडू लागले व ज्यावेळी आईचा मृत्यू झाला
त्यावेळी ते साई समाधी दर्शन घेत होते. हा एक योगायोग होता, परंतु आईच्या अंतविधीला जाण्यासाठी बस रात्री होती त्यामुळे ते मोठया अडचणीत सापडले तर खासगी कार चे भाडेही खूप महाग जात होते, अशावेळी हैदरभाई पठाण यांनी माणुसकीचा हात देत जैन यांना धीर दिला व मुलगा शाहरुख याला स्वतःची गाडी घेऊन अंत्यविधीसाठी वेळेत पोहचविण्यासाठी जाण्यास सांगितले. शाहरुखने वडिलांच्या सांगण्यावरून जाण्याची तयारी फक्त दहा मिनिटात केली.
राजस्थान बॉर्डर पर्यंतचा एक साईडचा प्रवास साडे पाचशे किलोमीटरचा होता परंतु शाहरुखने सलग नऊ तास ड्रायविंग करून सदर भक्ताला सुखरूप घरी सोडले व त्यांना आईच्या अंत्यसंस्कारासाठी वेळेत घरी पोहचऊन आपले कर्तव्य पार पाडले व जैन यांच्याकडून फक्त डिझेलचे पैसे घेऊन परत शिर्डीला निघाले. विशेष म्हणजे खासगी गाडीचे वीस हजारहुन अधिक भाडे झाले असते परंतु माणुसकी जोपासत त्यांनी भाविकाकडून कुठलेही पैसे घेतले नाही
व परत नऊ तासाचा प्रवास करून शाहरुखभाई पठाण शिर्डीत शनिवारी पहाटे आले. ना जेवण ना नास्ता फक्त भाविकांची सेवा आणि केलेली वेळेवरची मदत ही कुठेतरी शिर्डी ग्रामस्थांना प्रेरणा देणारी ठरली.मी हे काम प्रामाणिक हेतूने केले असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
अर्थात एक मुस्लिम तरुण शिर्डीत एका भाविकाला आपल्या जीवाची पर्वा नकरता संकटात मदत करतो ही बाब शिर्डीत कळताच अनेकांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. शाहरुख पठाण यांचे कौतुक करावे तेव्हडे थोडेच आहे. परंतु पत्रकार या नात्याने आपल्या लेखणीच्या आधारे त्यांचे मनापासून अभिनंदन करणे हा माझा धर्म आणि कर्तव्य समजतो.
