शिर्डी येथील साईबाबा मंदिर दर्शन व आरती पासची उच्च दरात विक्रीची मा. उच्च न्यायालयाकडून दखल !
शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी येथील साईबाबा मंदिर दर्शन व आरती पासची उच्च दरात विक्रीची मा. उच्च न्यायालयाकडून दखल घेण्यात आली असून आधार नंबर टाकून दर्शन व आरती पास द्या-असे मान्य उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच
दर्शन व आरती पास साठी प्रत्येक भक्ताची माहिती संस्थान ने घ्यावी. असेही माननीय उच्च न्यायालयाने साई संस्थांनला सांगितले आहे.
कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी साईबाबा मंदिर व परिसर, शिर्डी यांची सुरक्षा, केंद्रीय पोलीस राखीव बळ किंवा केंद्रीय औद्योकीय सुरक्षा बळ यांच्या मार्फत देण्यात यावी. यासाठी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ऍड सतीश तळेकर यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल करून आव्हान दिले आहे.
सदर जनहित याचिका मध्ये असे नमूद आहे कि, विविध पोलीस अधिकारी व साईबाबा संस्थान च्या विश्वस्त यांनी वेळोवेळी मंदिर सुरक्षा केंद्रीय पोलीस राखीव बळ किंवा केंद्रीय औद्योकीय सुरक्षा बळ यांच्या मार्फत देण्यात यावी यांसाठी विविध स्तरावर पाठपुरावा केले आहे पण आजवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शिर्डी येथे गुन्हेगारीचे प्रमाण रोज वाढत आहे तसेच साईभक्तांची सुरक्षा मजबूत करण्याची गरज आहे.
सदर बाब लक्षात घेता मा. उच्च न्यायालयाने मा. प्रबंधक, उच्च न्यायालय, आंध्र प्रदेश, यांना आंध्र प्रदेशस्थित तिरुपती बालाजी देवस्थान येथे तैनात असलेल्या सुरक्षा व्यवस्था संदर्भात गोपनीय अहवाल सादर करण्याची विनंती केली होती आणि त्यानुसार मा. प्रबंधक उच्च न्यायालय आंध्र प्रदेश यांनी गोपनीय अहवाल द्वारे तिरुपती देवस्थान मध्ये असलेल्या सुरक्षा संदर्भात माहिती सादर केली. त्यावर मा. उच्च न्यायालय अभ्यास करून पुढील निर्णय घेणार आहे.
मा. न्यायालयाने, जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर तथा अध्यक्ष यांनी सादर केलेल्या गोपनीय अहवाला मधील गंभीर निरीक्षणे लक्षात घेता मंदिराच्या सुरक्षा संदर्भात काही एक बदल न करता सर्व सुरक्षा व्यवस्था प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षांच्या आदेशानुसार च चालेल अथवा बदलेल असे निर्देश दिले. मंदिराच्या सुरक्षा संदर्भात निर्णय घेताना अध्यक्षांचा परवानगीशिवाय कुठलाही बदल करता येणार नाही. असे देखील पुढे नमूद केले आहे.