
अहिल्यानगर | सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत असीम सरोदे यांनी अहिल्यानगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, “रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, लोकांच्या हाडापर्यंत हादरे बसत आहेत. वयोवृद्ध, गर्भवती स्त्रिया, लहान मुलं — सर्वांची परिस्थिती दयनीय आहे. या रस्त्यांमुळे ड्रायव्हरपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण त्रस्त झाले आहेत.”
‘चांगले रस्ते हा जीवनावश्यक हक्काचा भाग’ — सरोदे यांचा न्यायालयीन दाखला
सरोदे म्हणाले की, “उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की, चांगले रस्ते असणे हा जीवनावश्यक हक्कांचा भाग आहे. पण तरीही सरकार आणि मंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे मंत्री झोपा काढत आहेत का? नागरिकांचे प्रश्न तुम्हाला दिसत नाहीत का?”
‘खड्ड्यांसाठी बोला, हिंदू-मुस्लिम नाही!’ — सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा
सरोदे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर सुद्धा टीका करत म्हटले, “तुम्ही हिंदू-मुस्लिम भांडण लावत फिरता, पण खड्ड्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर येऊन आक्रोश करा. हेच लोकांचे खरे प्रश्न आहेत.”
‘फक्त सत्तेचे लोणचं — लोकांचे प्रश्न गौण’
“राधाकृष्ण विखे पाटील हे इतके अनुभवी मंत्री आहेत, तरी अहिल्यानगर रस्त्याचे अनेक वर्षांपासून प्रश्न सोडवले जात नाहीत. विधानपरिषदेचे अध्यक्ष राम शिंदे बसले आहेत, पण हे सगळे लोक सत्तेच्या खुर्चीत गुंग झाले आहेत. तुम्हाला फक्त पदं आणि सत्ता हवीय, पण लोकांचे दुःख दिसत नाही,” असा थेट सवाल असीम सरोदे यांनी केला.
‘तात्काळ रस्ते दुरुस्त करा — अन्यथा आंदोलन उभारणार’
सरोदे यांनी प्रशासनाला इशारा दिला की, “जर हे रस्ते तात्काळ दुरुस्त केले नाहीत, तर आम्ही मोठं जनआंदोलन उभारू. अहिल्यानगर हा पुरोगामी परिसर आहे, पण सध्या इथे फक्त खड्डेच दिसतात. सरकारने तातडीने पाऊल उचलले पाहिजे.”
‘मंत्री घरात बसलेत, लोक मरत आहेत!’ — तीव्र आरोप
अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करत सरोदे म्हणाले,
“इतके अनुभवी मंत्री असून तुम्ही घरात बसता का? लोकांचे प्रश्न न सोडवता कशाचे मंत्री आहात? इथे लोकांचे जीव जात आहेत आणि आपण गप्प बसता — हे योग्य नाही,” असा संतप्त सवाल त्यांनी केला.