अहिल्यानगर, दि. १३ – जिल्ह्यातील १२ नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. नियुक्त अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात भेटी देऊन निवडणुकीच्या सर्व तयारीचा आढावा घेणार आहेत.
विशेष म्हणजे, शिर्डी नगरपरिषदेसाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह कोपरगाव आणि संगमनेर या नगरपरिषदांचाही कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शिर्डीसारख्या संवेदनशील आणि लक्षवेधी मतदारसंघासाठी अनुभवी अधिकारी नेमण्यात आल्याने प्रशासनिक पातळीवर विशेष तयारीला सुरुवात झाली आहे.
तसेच राहाता, देवळाली प्रवरा व राहुरी या नगरपरिषदांसाठी नंदुरबारचे अपर जिल्हाधिकारी पांडुरंग मगदूम, श्रीरामपूर, शेवगाव व नेवासा साठी जळगावचे अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, तर पाथर्डी, श्रीगोंदा व जामखेड नगरपरिषदांसाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निरीक्षकांना मतदान केंद्रांची उपलब्धता, स्ट्रॉंग रूम, मतमोजणी केंद्रांची तयारी, कर्मचारी व प्रशिक्षण व्यवस्था, आचारसंहिता अंमलबजावणी, खर्च नियंत्रण तसेच पेड न्यूज व सोशल मीडिया निरीक्षणावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
नामनिर्देशन छाननीपासून ते मतदान व मतमोजणीपर्यंतच्या सर्व टप्प्यांचा आढावा घेऊन संबंधित अहवाल विभागीय आयुक्त व राज्य निवडणूक आयोगास सादर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
✨ शिर्डी मतदारसंघावर आता निवडणूक निरीक्षक ओमकार पवार यांची नजर, काटेकोर अंमलबजावणीला सुरुवात! 🗳️
