
शिर्डी प्रतिनिधी
साईबाबांच्या पवित्र नगरी शिर्डीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या महिला टोळीवर पोलिसांनी धाड टाकत दोन महिलांना ताब्यात घेतले तर चार महिला गर्दीचा फायदा घेऊन पसार झाल्या. ही कारवाई साईबाबा मंदिर परिसरात करण्यात आली.
🔹 गुप्त माहितीवरून पोलिसांची वेगवान हालचाल
शिर्डी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक श्री. गलांडे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर महिला पोलीस कर्मचारी सविता सुधाकर भांगरे (मपोहवा/1668) यांनी तात्काळ पथक तयार केले. त्यांच्या सोबत धनश्री शाहू मुंडे, रक्षा निखाडे आणि प्रियांका गुंड यांनी साध्या वेशात पेट्रोलिंग सुरू केले.
गेट क्रमांक ३ जवळील १६ गुंठे परिसरात ६-७ महिला संशयास्पद हालचाली करताना दिसल्या. या महिला गर्दीत मिसळून नागरिकांच्या खिशावर डोळा ठेवून रेकी करत असल्याचे पोलिसांनी पाहिले.
🔹 दोन महिला पकडल्या, चौघी पसार
महिला पोलिसांनी कारवाई करत लाली लक्ष्मण सिंग (20) आणि रुक्मणी गोपाल सिंग (22) या दोघींना ताब्यात घेतले. दोघीही हरियाणातील मरोली, ता. होडल (जि. फरिदाबाद) येथील आहेत.
त्यांच्या पर्समध्ये ब्लेड व कटर मिळून आले असून चोरीसाठी तयारी केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
इतर चार महिला — लच्चो लक्ष्मण सिंग, सितो प्रेम सिंग, कौशल्या हुकुम सिंग आणि भटेरा सिताराम सिंग — या गर्दीचा फायदा घेऊन पळून गेल्या.
🔹 BNS कलम 310(4), 310(5) अंतर्गत गुन्हा दाखल
या घटनेवरून महिला पोलीस सविता भांगरे यांच्या फिर्यादीवरून FIR क्रमांक 0934/2025 नोंदवण्यात आला आहे. आरोपी महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 310(4), 310(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून फरार महिलांचा शोध सुरू आहे.
शिर्डी पोलीस ठाण्याच्या दक्ष पथकाने दाखवलेली तात्काळ प्रतिक्रिया व सजगता यामुळे मोठी चोरी टळल्याचे मानले जात आहे.
