शिर्डी – महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके उध्वस्त झाली, घरे कोसळली, अनेक ठिकाणी जनावरांचे मोठे नुकसान झाले असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिर्डी येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली.

ही बैठक माजी खासदार मा. श्री. सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिर्डी विश्रामगृह येथे पार पडली.
बैठकीस जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकसानीचे पंचनामे, मदतीसाठी आवश्यक योजना आणि तातडीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या तातडीच्या मागण्यांवरही विचारविनिमय झाला.
शेतकरी व नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आवाहन
जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व नितीन औताडे यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने प्रशासनाला गती देण्याचे आवाहन करत शेतकरी व नागरिकांना त्वरित मदत देण्याची मागणी केली.
बैठकीनंतर माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, “ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. मदत वितरणात कोणतीही ढिलाई होऊ नये.”
प्रशासन सज्ज – मदतीच्या यंत्रणा कार्यरत
शिर्डी व राहाता तालुक्यातील विविध गावांमध्ये आधीच पंचनाम्यांचे काम सुरू झाले असून, शेतकऱ्यांच्या अर्जावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महसूल व कृषी विभागाच्या पथकांनी गावोगावी जाऊन थेट शेतकऱ्यांकडून माहिती घेतली आहे.
सरकारी अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शेतकरी व नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल. पिकांचे नुकसान, घरांचे नुकसान तसेच जनावरांच्या नुकसानीसाठी वेगवेगळ्या योजना राबवून मदत तातडीने वितरित करण्यात येईल.
