शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीतील अतिक्रमणग्रस्त नागरिकांसाठी वंचित बहुजन आघाडी, एकलव्य आदिवासी आघाडी आणि समविचारी संघटनांकडून संघर्षाचे रणशिंग फुकंण्यात आले असून त्यांच्या वतीने हे आंदोलन होणार आहे.
शिर्डी नगरपरिषद तसेच निमगाव कोऱ्हाळे व निघोज ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक दलित, आदिवासी आणि भूमिहीन मजूर गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या निवासासाठी घरे बांधून राहत होते.
मात्र, पाटबंधारे विभागाने ही घरे बेकायदेशीरपणे पाडून अनेक कुटुंबांना उघड्यावर आणले आहे.या अन्यायाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आदिवासी नेते व एकलव्य आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष यांनी राधाकृष्ण विखे यांच्या लोणी येथील निवासस्थानावर बिरहाड आंदोलनाचे नियोजन केले होते.
त्यानंतर, राहता तहसीलदार, प्रांत अधिकारी, डीवायएसपी, राहता पोलीस निरीक्षक आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत प्रशासनाने आठ दिवसांत अतिक्रमणग्रस्तांसाठी पर्यायी जागेचे नियोजन करण्याचे लेखी आश्वासन दिले. सुजय विखे यांनीही त्यावर सहमती दर्शवली होती.
परंतु प्रशासनाने दिलेला शब्द पाळलेला नाही.आंदोलनातील मागण्यांसंदर्भात प्रशासनाशी चर्चा झाली असता, प्रांत अधिकाऱ्यांनी संबंधित सरपंचांना अतिक्रमणग्रस्तांना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली. तसेच, निमगाव कोराळे ग्रामपंचायत हद्दीत जागा साफसफाईचे काम सुरू असल्याचे सांगितले. मात्र, या जागेवर अतिक्रमणधारकांना अधिकृत ताबा मिळालेला नाही. पावसाळ्याच्या तोंडावर या कुटुंबांना निवाऱ्याची निकड आहे.
तरीही प्रशासन अधिक वेळ मागत आहे, हे अत्यंत अन्यायकारक आहे.यामुळे प्रशासनाने आंदोलनाच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने 27 मार्च 2025 रोजी शिर्डी प्रांत कार्यालयावर बेमुदत बिर्हाड आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या पत्रकात प्रशासनाने अतिक्रमणधारकांना त्वरित पर्यायी जागेचा सातबारा देऊन अधिकृत ताबा द्यावा.
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची संपूर्ण यादी जाहीर करावी, शिर्डी नगरपरिषद, निमगाव कोराळे आणि निघोज ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अतिक्रमणधारकांची अधिकृत यादी आंदोलकांना प्रदान करावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
सर्व समविचारी संघटनांचे, कार्यकर्त्यांचे व नागरिकांचे या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.