शालेय शिक्षणमंत्री केसरकर साई दरबारी,मनोभावे घेतले साईबाबांचे दर्शन
शिर्डी ( प्रतिनिधी) शाळा मजबुती करण्याच्या निर्णयामध्ये एकही शाळा बंद केली जाणार नाही. एकाही शिक्षकाला कमी केले जाणार नाही. हा निर्णय जाहीर केला असताना देखील मोर्चे निघत आहेत. ही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याची राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी शिर्डीत खंत व्यक्त केली.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी यावेळी संवाद साधलाय. शिक्षकांना सगळ्यात जास्त सवलती देण्याचा निर्णय घेणारा मी एकमेव मंत्री आहे. एवढ्या सवलती देऊन सुद्धा शिक्षक आंदोलन करत असतील तर यांची ही भूमिका मला मान्य नाही, असेही यावेळी केसरकर म्हणाले आहे. आज अनेक शिक्षक गावी राहत नसताना देखील भत्ते घेत आहेत. मी यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतोय. मी एक गोष्ट जरी वाचविली तर दोन हजार चारशे कोटी रुपये वाचतील आणि या पैशातून राज्यातील सगळ्या शाळा दुरुस्त करू शकतात, अशा शब्दात मंत्री केसरकर यांनी शिक्षकांची शाळा घेतलीय.
आता अशा शिक्षकांवर कारवाई करणार असल्याचे सांगून शाळा मजबुतीकरणाच्या निर्णयामध्ये एकही शाळा बंद केली जाणार नाही. एकाही शिक्षकाला कमी केले जाणार नाही. हा निर्णय जाहीर केला असताना देखील मोर्चे निघत आहेत. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय. लोकांना भडकवणारी लोक एका विशिष्ट संघटनेची असल्याचं मला समजले, असे केसरकर म्हणाले आहे. विद्यार्थ्यांना तरी राजकारणापासून लांब ठेवा.
त्यांना चांगले शिक्षण घेऊ द्या. चांगले शिक्षण घेणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना मोर्चाला आणणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावीच लागेल, असेही यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहे. राज्यातील अनेक शाळा इमारती मोडकळीस आल्या आहेत. याची जाणीव शासनाला सुद्धा आहे. त्यामुळे तोही निर्णय लवकर घेण्यात येईल असे आमदार दीपक केसरकर म्हणाले.