राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचे सस्पेन्स अद्यापही कायम आहे. कारण तब्बल २५ वर्षांनंतर नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे आणि हे पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.
शिर्डी नगरपरिषदेचे एकूण ११ प्रभाग असून २३ नगरसेवक पदे आहेत. त्यापैकी ५० टक्के महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने यावेळी महिलाराज राहणार हे निश्चित झाले आहे.
🧾 सुकानु समितीकडे उमेदवारांची रांग
सोळा नगराध्यक्ष पदासाठी, चाळीस नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल
नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीतील जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा १३ सदस्यीय सुकानु समितीचा गठन करण्यात आला आहे.
या समितीकडेच उमेदवार निवडण्याचे अधिकार देण्यात आले असून, इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी सर्वप्रथम या समितीकडे अर्ज सादर करणे बंधनकारक केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या समितीकडे नगराध्यक्ष पदासाठी १६ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी ४० अर्ज प्राप्त झाले आहेत.
🕴️ विखे पाटील गटात पेच कायम — रविवार निर्णायक!
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत सुकानु समितीची पहिली बैठक पार पडली असून, त्यात समितीने उमेदवारांच्या पार्श्वभूमी व पात्रतेचा आढावा घेतला.
आता रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समवेत दुसरी निर्णायक बैठक होणार आहे.
या बैठकीतच नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड धाकधूक आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे.
⚔️ तिरंगी लढतीचे संकेत — शिर्डीचे राजकारण तापले!
१० नोव्हेंबरपासून नामनिर्देशन फॉर्म ऑनलाइन भरावयास सुरुवात होणार असून अधिकृत पक्षनिहाय निर्णय येण्यास अजून दहा दिवस लागणार आहेत.
म्हणजेच उमेदवारांना प्रचारासाठी अवघे दहा दिवस मिळणार आहेत.
दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाड्यांसोबतच ज्येष्ठ नेते बाबुराव पुरोहित यांनी स्थापन केलेल्या अपक्षांच्या तिसऱ्या आघाडीमुळे तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या रणधुमाळीत आगामी निवडणुकीचे मुख्य मुद्दे कोणते असतील, हे प्रचार मोहिमेला सुरुवात झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.
📰 साईदर्शन न्यूज (SD News) — शिर्डी प्रतिनिधी