
कोपरगाव (प्रतिनिधी)
तक्रारदार अशोक शंकर लोणारी हे पत्नी पद्मावती, मुलगा विपुल व सून ज्योती हिच्या सह ब्राम्हणगाव येथे राहतात. 15 जुलै 2020 रोजी पद्मावती हिने गाईचे शेण उकिरड्यावर टाकले म्हणून लक्ष्मण लोणारी व त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रारदार अशोक लोणारी,पद्मावती लोणारी यांना टामी, कोयता व इतर हत्यारांनी मारहाण केली होती. त्यात तक्रारदार जखमी झाले होते आरोपीविरुद्ध सदरचा गंभीर गुन्हा दाखल करण्यासाठी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार अशोक याने वारंवार चकरा मारल्या .गंभीर गुन्हा असतांना 70 दिवस उशिराने म्हणजेच दोन महिने उशिराने तो दाखल करून घेतला. तक्रारदार अशोक याची फिर्याद दाखल करून घेण्यास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी अशोक आंधळे यांनी वरिष्ठांनी सूचना देऊनही गुन्हा दाखल करण्यास हलगर्जीपणा केला व तक्रारदाराला मानसिक त्रास दिला,
वरिष्ठ अधिकारी तात्कालीन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी आंधळे यांच्या गैरकृत्यांकडे दुर्लक्ष करत त्यांना पाठीशी घातले. या विरोधात कोपरगाव येथील ऍडवोकेट वैभव शिंदे यांच्यामार्फत तक्रारदार अशोक लोणारी यांनी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नाशिक यांच्याकडे न्याय मिळवण्यासाठी संबंधित पोलिस निरीक्षक अनिल कटके व कर्मचारी अशोक आंधळे यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली .

त्या तक्रारीची सुनावणी झाली. पोलीस निरीक्षक कटके व पोलीस कर्मचारी आंधळे यांचा जाबही घेण्यात आला . ही सुनावणी होऊन पुराव्यांच्या आधारे पोलीस तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्रधान जिल्हा न्यायाधीश दीपक अ. ढोळकीया व सदस्य सेवानिवृत्त पोलिस उप महानिरीक्षक शामराव दिघावकर यांच्या खंडपीठाने दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात न्याय निर्णय पारित केला आहे. यानंतर सदर न्याय निर्णय मंजुरीसाठी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे जाईल मंजुरीनंतर दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक व जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर हे कारवाई करणार आहेत. या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते. या निकालामुळे मोठी चर्चा सुरू आहे. हा निकाल पोलीस खात्याच्या मनमानी पणाला चपराक देणारा आहे. असे बोलले जात आहे.