
शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानने पर्यावरणपूरक ‘हरित ऊर्जा’ वापर वाढविण्यासाठी मोठा आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला आहे. संस्थानच्या विविध इमारतींच्या छतांवर तब्बल १७०९.९२ kWp क्षमतेचा ग्रीड-कनेक्टेड रूफटॉप सोलर पीव्ही प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) कडून CSR निधीतून सुमारे ४ कोटी ४५ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. उर्वरित खर्च संस्थान उचलणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी संस्थान आणि BPCL यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या वेळी शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यासह संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. BPCL फाउंडेशनचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
शिर्डीत दररोज देश-विदेशातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याने मंदिर परिसर, रुग्णालये, पाणीपुरवठा व्यवस्था आणि इतर सेवांसाठी अखंड वीजपुरवठा अत्यावश्यक ठरतो. वाढत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर संस्थानने ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे ठोस पावले उचलली आहेत.
यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये सुपा येथील पवनचक्की प्रकल्पातून ‘कॅप्टिव्ह ओपन ऍक्सेस’द्वारे वीज वापर सुरू करण्यात आला होता. या उपक्रमातून जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत तब्बल ५ कोटी ६४ लाख रुपयांची वीज बचत झाली आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या CSR निधीतून १.२ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प एप्रिल २०२६ अखेर कार्यान्वित होणार असून त्यातून दरवर्षी सुमारे १८ लाख युनिट वीज निर्मिती होऊन अंदाजे २ कोटी ८ लाख रुपयांची बचत अपेक्षित आहे.
BPCL मार्फत उभारण्यात येणाऱ्या १.७ मेगावॅट सौर प्रकल्पातून दरवर्षी सुमारे २६ लाख युनिट वीज निर्मिती होणार असून अंदाजे २ कोटी ५६ लाख रुपयांची बचत होईल. याशिवाय Oil and Natural Gas Corporation (ONGC) कडून १.९ मेगावॅट क्षमतेचा ग्राउंड माउंट सोलर प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही प्रक्रियेत आहे.
सध्या संस्थानचा एकूण वीज वापर सुमारे ७.९६ मेगावॅट इतका असून सर्व प्रस्तावित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पवन ऊर्जा, रूफटॉप सोलर आणि ग्राउंड माउंट सोलरच्या माध्यमातून सुमारे ७.३ मेगावॅट हरित ऊर्जा निर्मिती होणार आहे. त्यामुळे संस्थान लवकरच विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाला मोठी चालना मिळणार असून ‘हरित ऊर्जा’ वापरात श्री साईबाबा संस्थान देशासाठी एक आदर्श निर्माण करणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
