शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी परिसरातील निमगाव येथील श्रद्धा सबुरी नागरी सहकारी पतसंस्था आर्थिक गैरव्यवहारामुळे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तब्बल ४१ कोटी ९७ लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याने पंचक्रोशी हादरली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे असून, गेल्या दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने संचालक बाळासाहेब संपत बारसे आणि कर्मचारी अशोक मोतीलाल उदावंत या दोघांना निमगाव कोऱ्हाळे गावातून शिताफिने अटक केली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांनी दिली.
२१ संचालक आणि ६ कर्मचाऱ्यांविरुद्ध ठेवीदार संरक्षण अधिनियमाखाली गुन्हे दाखल
या घोटाळ्याची नोंद १५ मे २०२५ रोजी शिर्डी पोलीस ठाण्यात करण्यात आली. गुन्हा क्रमांक १९८/२०२५ अंतर्गत एकूण २१ संचालक आणि ६ कर्मचाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९ तसेच फसवणूक आणि विश्वासघाताचे कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यापूर्वीच पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र सिताराम गाडेकर, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कारभारी गाडेकर, तसेच व्यवस्थापक अनिल तानाजी खैरे यांना अटक करण्यात आली होती. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले, आणि वैभव कलबुर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे.
लेखापरीक्षणात मोठा गैरव्यवहार उघड — ६० कोटींच्या कर्ज थकबाकीचा पर्दाफाश
संस्थेचे लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर तब्बल ४१ कोटी ९७ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला. याशिवाय, सुमारे ६० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सदर पतसंस्थेत पाच ते सहा गावांतील गोरगरीब नागरिक, व्यावसायिक, साईबाबा संस्थानचे कर्मचारी, दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी, सेवानिवृत्त अधिकारी तसेच रेल्वे आणि समृद्धी महामार्गासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी आपली आजीविका सुरक्षित ठेवण्यासाठी लाखो रुपयांच्या ठेवी ठेवलेल्या होत्या. मात्र या सर्वांचा विश्वासच डळमळीत झाला आहे.
‘जास्त व्याजदर’चे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक!
बँक खात्यांतील माहितीचा गैरवापर करून व्यवस्थापक अनिल खैरे हे ठेवीदारांशी थेट संपर्क साधत असत. त्यांना जास्त व्याजदर आणि खात्रीशीर परतावा मिळेल असे सांगून ठेवी ठेवण्यास प्रवृत्त केले जात होते. व्हाईस चेअरमन बाळासाहेब गाडेकर आणि खैरे हे दोघेही रोज ग्रामीण भागात फिरून ठेवी गोळा करत होते.
काही काळासाठी छोट्या ठेवी परत केल्या गेल्या, परंतु मोठ्या ठेवी थकवल्यामुळे ठेवीदारांमध्ये संताप उसळला. ठेवीदारांनी अखेर सहकार खात्याकडे तक्रारी दाखल केल्या आणि प्रशासनाने हस्तक्षेप करत गुन्हा नोंदवला.
सहकार खात्याचा हस्तक्षेप — प्रशासकांकडून वसुलीची मोहीम सुरू
सध्या या पतसंस्थेवर राहाता सहकार खात्यातील अधिकारी संजय पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी थकबाकीदारांकडून वसुली सुरू केली असून, संबंधितांना कायद्यानुसार नोटिसा बजावल्या गेल्या आहेत.
पाटील यांनी सांगितले की, “ठेवीदारांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. थकबाकी वसुलीनंतर ठेवीदारांना त्यांची रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. संस्थेतील अपहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
घोटाळ्याने पंचक्रोशी हादरली — ठेवीदारांच्या डोळ्यात अश्रू, पोलिसांकडून सतत चौकशी सुरू
या घोटाळ्यामुळे निमगाव निघोज परिसरात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अनेक ठेवीदार आपली आयुष्यभराची कमाई गमावून हवालदिल झाले आहेत. पोलिसांकडून चौकशीचा वेग वाढवण्यात आला असून, अजून काही आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकांचा एकच सवाल — “ठेवीदारांचा विश्वास परत मिळवणार कोण?”
अटकपूर्व जामिनाचे अर्ज फेटाळले — आरोपींना मोठा धक्का!
या प्रकरणातील काही संचालकांनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, न्यायालयांनी या सर्व अर्जांना फेटाळा देत आरोपींना मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर तपास अधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी मोकळा मार्ग मिळाला आहे.
सर्व आरोपी ताब्यात घेण्याची तयारी — गुन्हे शाखा सज्ज!
गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी लवकरच सर्व आरोपींना ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. तपास अधिकारी आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करत असून, काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची टीम या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहे.

