शिर्डी (प्रतिनिधी) — शिवसेना जिल्ह्याच्या वतीने आज शिर्डी शहरात खासदार संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आले. शिर्डीचे ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर अत्यंत भक्तीभावाने हा यज्ञ पार पडला.
या प्रसंगी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय अप्पा शिंदे, कोपरगाव तालुक्याचे भरत मोरे, अमोल गायके, तसेच शिर्डी शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पत्नींसह शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यज्ञ संपल्यानंतर सर्वांनी मिळून साईबाबांच्या समाधी मंदिरात आरती केली आणि साहेबांच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी साई चरणी साकडं घातलं.
संजय राऊत हे स्वतः साईभक्त असल्याने त्यांचे आणि शिर्डीकर कार्यकर्त्यांचे भावनिक नातं अतूट आहे. त्यांच्या आरोग्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवर प्रार्थना आणि उपवासही सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
तालुकाध्यक्ष संजय अप्पा शिंदे म्हणाले —
“साहेब हे आमच्या पक्षाचे विचार नेते आणि शिवसेनेचे बळ आहेत. त्यांची तब्येत लवकर सुधारावी हीच आमची साईनाथ चरणी प्रार्थना आहे. आज शेकडो शिवसैनिकांनी श्रद्धा आणि निष्ठेने महामृत्युंजय जप केला. संजय राऊत साहेब लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा जनतेच्या सेवेसाठी उभे राहोत, हीच साईकृपा आमच्या सर्वांची अपेक्षा आहे.”
जेष्ठ शिवसैनिक भरत मोरे म्हणाले —
“संजय राऊत हे फक्त आमचे नेते नाहीत, तर ते आमच्या विचारांचे दिशादर्शक आहेत. त्यांच्या आजारपणाची बातमी समजताच शिर्डी आणि कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिक अस्वस्थ झाला होता. आजचा हा यज्ञ म्हणजे आमच्या भावनेचा, निष्ठेचा आणि साईभक्तीचा संगम आहे.”
अमोल गायके म्हणाले —
“साईबाबांनी नेहमी ‘श्रद्धा आणि सबुरी’ शिकवली आहे. आम्हीही त्याच भावनेने साहेबांच्या आरोग्यासाठी महामृत्युंजय जप केला. संजय राऊत साहेब हे महाराष्ट्राच्या आवाजाचे प्रतीक आहेत. त्यांची प्रकृती लवकर सुधारो आणि ते पुन्हा जनतेमध्ये जोमाने उभे राहोत हीच इच्छा.”
शेकडो शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग
हनुमान मंदिर परिसरात झालेल्या या धार्मिक विधीत शेकडो शिवसैनिक, महिला पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि साईभक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. यज्ञ संपल्यानंतर “जय साईनाथ”, “जय भवानी जय शिवाजी” आणि “संजय राऊत साहेब लवकर बरे व्हा” अशा घोषणा परिसरात दुमदुमल्या.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुका संघटनेच्या वतीने करण्यात आले होते, तर सर्व धार्मिक विधी पंडितांच्या मंत्रोच्चारात पार पडले.
संपूर्ण वातावरण भक्तीभाव, निष्ठा आणि साईभक्तीने भारलेले होते.