शिर्डी | प्रतिनिधी :
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेल्या एका साईभक्तेचा शिर्डी परिसरात हरवलेला महागडा आयफोन १३ प्रो मॅक्स शिर्डी पोलिसांच्या तत्परतेमुळे पुन्हा त्यांच्या हातात सुखरूप परतला. पोलिसांच्या या प्रामाणिक आणि कौतुकास्पद कार्याबद्दल संबंधित साईभक्तेने शिर्डी पोलीस स्टेशनचे मनःपूर्वक आभार मानले.
उर्वशी महेंद्र पटेल, मूळ राहणार सुभाषपोर, ता. आनंद, जि. गुजरात असून सध्या त्या कॅनडा-अमेरिका येथे वास्तव्यास आहेत. साईबाबांच्या दर्शनासाठी त्या शिर्डीत आल्या होत्या. दर्शन व शिर्डी परिसरातील प्रवासादरम्यान त्यांचा आयफोन १३ प्रो मॅक्स अचानक हरवला.
मोबाईल हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या मनात मोठी चिंता निर्माण झाली. परदेशात वास्तव्यास असलेल्या साईभक्तेसाठी मोबाईलमध्ये असलेली वैयक्तिक माहिती, संपर्क क्रमांक आणि इतर महत्त्वाचा डेटा यामुळे हा मोबाईल परत मिळणे अत्यंत गरजेचे होते.
दरम्यान, शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तत्परतेने कार्यवाही केली. पोलिसांच्या प्रयत्नातून हरवलेला मोबाईल शोधून काढण्यात आला. त्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनकडून उर्वशी पटेल यांच्याशी संपर्क साधून त्यांचा आयफोन त्यांना परत करण्यात आला.
हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने उर्वशी पटेल यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. “शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले असताना माझा मोबाईल हरवला होता. मात्र शिर्डी पोलिसांनी तत्परतेने प्रयत्न करून तो मला परत मिळवून दिला. पोलिसांचे मनःपूर्वक आभार,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
शिर्डी पोलिसांच्या या कार्यामुळे ‘साईनगरीत भक्तांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी पोलीस सदैव तत्पर आहेत’ हा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात. अशा परिस्थितीत हरवलेल्या वस्तूचा शोध घेऊन ती संबंधित भाविकाला परत मिळवून देणे, ही शिर्डी पोलिसांची माणुसकी आणि कर्तव्यनिष्ठेची कौतुकास्पद बाब ठरली आहे.