दोन लाख साठ हजार रुपयांचा ऐवज लंपास शिर्डीतील घरफोडी प्रकरणाचा उलगडा- रेकॉर्डवरील आरोपी अटकेत
शिर्डी (प्रतिनिधी):
गणेशवाडी, गोविंदनगर शिर्डी येथील दत्तात्रय विश्वनाथ जोशी (वय ६७) हे कामानिमित्त मुंबई येथे गेले असता, २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते २५ सप्टेंबर सकाळी ७ या वेळेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला.
चोरट्याने घरातील सुमारे दोन लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🔍 स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई
जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार केले.
या पथकात पोउपनि. दीपक मेढे, पो.अं. विजय पवार व रमिझराजा आत्तार यांचा समावेश होता. पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची माहिती गोळा केली व पूर्वी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची पार्श्वभूमी अभ्यासली.
🚨 आरोपी पर्वतसिंग सिकलीकर पोलिसांच्या जाळ्यात
तपासादरम्यान पथकास माहिती मिळाली की, हा गुन्हा पर्वतसिंग दिलीपसिंग सिकलीकर (वय ३२, रा. एकतानगर, नंदुरबार) याने केला आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, सध्या धुळे जिल्ह्यात राहत असल्याचे निष्पन्न झाले.
निजामपुर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने शिर्डी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. चौकशीअंती आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरी केलेल्या मालाविषयी पुढील तपास सुरू आहे.
📁 आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे नोंद
आरोपी पर्वतसिंग सिकलीकर याच्यावर बीड व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये घरफोडी, चोरी व नकली चलनी नोटा संबंधित एकूण तीन गुन्हे नोंद असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे हे करीत आहेत.
दै. साई दर्शन परिवाराकडून पोलिसांच्या तात्काळ आणि कार्यक्षम कारवाईस सलाम 👏