साई संस्थान एप्लाईज क्रेडिट सोसायटीच्या वतीने यंदा सभासदांना प्रत्येकी पन्नास किलो साखर, दहा किलो खाद्यतेल आणि एक किलो मिठाई भेट देऊन त्यांची दिवाळी गोड केली जाईल. शेअर्सच्या रकमेवर बारा टक्के डिव्हिडंड दिला जाईल. सभासदांचा प्रत्येकी दहा लाख रुपयांचा विमा उतरविला. विमा हप्त्याची निम्मी रक्कम संस्था अदा करेल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी दिली.
संस्थेची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. त्याबाबत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पोपटराव कोते, प्रभारी सचिव विलास वाणी, सहसचिव बाळासाहेब अनार्थे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले की, संस्थेच्या वार्षिक सभेत वैकुंठ रथ खरेदी करणे, तर मध्यवर्ती कार्यालय नवी जागा स्थलांतरीत करणे या दोन्ही विषयांवर एकमत झाले नाही.
त्यामुळे हे दोन्ही विषय स्थगित ठेवण्यात आले आहेत. साई ज्योत ही संस्थेची अर्धवट स्थितीतील इमारत तशीच पडून आहे. त्यास नेमके जबाबदार कोण, हे निश्चित करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांनी लवकरच नियुक्ती होत आहे. संस्थेने अहवाल काळात कर्मचाऱ्यांना दोन वेळा वेतनवाढ दिली. प्रत्येकी जवळपास दोन हजार रुपये दरमहा वेतन वाढ झाली. संस्थेचे सुमारे १ हजार ५६० सभासद आणि १३८ कर्मचारी आहेत.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मार्गदर्शन व सहकायने संस्थेची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. साई संस्थानची तदर्थ समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि अधिकारी वर्गाचे देखील सहकार्य आहे. या सर्वांच्या सकारात्मक भूमिकेमुळे संस्थेला साई भक्तांसाठी सेवा पुरविण्याची संधी मिळते.
संस्थेच्या वतीने भाविकांसाठी मोफत चप्पल स्टॅण्ड चालविले जाते.अहवाल काळात संस्थेला ५ कोटी ८ लाख रुपये नफा झाला.
साईभक्तांची लुटमार होऊ नये, यासाठी संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ आणि हार विक्री केले जाते. नियंत्रित दर ठेवण्यात आले आणि खरेदीची पावती देखील दिली जाते. महिन्याकाठी अडीच ते तीन लाख रुपयांची उलाढाल त्यातून होते. संस्थेच्या कर्मचाऱ्यांना रोजगार देखील मिळाला आहे