चंपाषष्ठी निमित्त शिर्डीच्या श्री खंडोबा मंदिरात सकाळपासून अभिषेक पूजासह विविध होत आहेत धार्मिक कार्यक्रम!
शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी येथील प्रसिद्ध अशा श्री खंडोबा मंदिरात श्री मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बुधवार दिनांक 13 डिसेंबर ते मंगळवार दिनांक 19 डिसेंबर या कालावधीत श्री चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जात असून दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे. चंपाषष्ठी निमित्त भाविकांनी येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत.

आओ साई म्हणत म्हाळसापती याच मंदिरात श्री साईबाबांना हाक मारली .तेव्हापासूनच साईबाबा हे नाव पडले. अशा प्रसिद्ध श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव दरवर्षी साजरा होतो यावर्षी तो साजरा होत असून आज चंपाषष्ठीच्या मुख्य दिवशी सोमवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता अभिषेक पूजा करण्यात आली. सकाळी सात ते अकरा वाजता श्री मल्हारी महात्म पारायण व तळी भंडारा चा कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी बारा वाजता मध्यान आरती व नैवेद्य पूजा संपन्न झाली. त्यानंतर दुपारी एक ते तीन या वाजे दरम्यान अन्नदान भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. आज चंपाषष्ठी निमित्त शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी येथे भेट देऊन श्री खंडेरायाचे दर्शन घेतले.
त्यांच्यासोबत शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते हे उपस्थित होते. त्यांचा येथील ट्रस्टच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रात्री नऊ ते दहा या वेळेत श्री साई भक्त श्री म्हाळसापती भगत व श्री खंडोबा महाराज यांच्या प्रतिमेची श्री साईंच्या समाधी मंदिरात भेट व दर्शन नंतर श्री खंडोबा मंदिराकडे प्रस्थान होणार आहे आणि त्यानंतर रात्री अकरा वाजता वाघ्या मुरळीचे देव जागरण व कथा कार्यक्रम होणार आहे.
तर सांगता दिनी मंगळवारी 19 डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता अग्निकुंड होम शुभारंभ होणार असून दिवसभर येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. अशी माहिती संदीप मनोहर नागरे, अजय मनोहर नागरे यांनी दिली आहे.