समाधी मंदिरात पाद्यपूजा सोहळा संपन्न

श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर परिसर भक्तिभावाने न्हाऊन निघाला. सकाळच्या शुभमुहूर्तावर संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सौ. अंजू शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते श्री साईबाबांच्या पाद्यपूजेचा विधी संपन्न झाला. या प्रसंगी मंदिरात टाळ- मृदुंग, घंटानाद, भजन व मंत्रोच्चारांच्या गजरात वातावरण पवित्र झाले होते. पाद्यपूजा झाल्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सोहळ्याला मोठ्या संख्येने साईभक्तांनीही साक्षीदार होऊन भाविकतेचा अनुभव घेतला.
लेंडीबागेत ध्वजपूजनाची परंपरा जपली
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून लेंडीबागेत दरवर्षीप्रमाणे ध्वजपूजनाचा कार्यक्रम यंदाही दिमाखात पार पडला. संस्थानच्या अध्यक्षा सौ. अंजू शेंडे (सोनटक्के) व श्री. प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्र. जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, मंदिर पुजारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजपूजन सोहळ्यानंतर साईभक्तांच्या उपस्थितीत आरती व नामस्मरण करण्यात आले. भाविकांनी साईनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनात सुख-समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली.
पुण्यतिथीनिमित्त भिक्षा झोळी कार्यक्रम
साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचा अविभाज्य भाग असलेला “भिक्षा झोळी” कार्यक्रम मोठ्या श्रद्धा-भक्तीने पार पडला. या कार्यक्रमात संस्थानच्या अध्यक्षा सौ. अंजू शेंडे (सोनटक्के), मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, मुख्य लेखाधिकारी सौ. मंगला वराडे, मंदिर कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त यांनी सहभाग घेतला. परंपरेनुसार मंदिरातील पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भिक्षा झोळी काढण्यात आली. यामध्ये १० ग्रामस्थ व १० साईभक्त यांनीही सक्रिय सहभाग घेऊन या कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप दिले. या भिक्षा झोळीमधून मिळालेली भिक्षा व अन्नसामग्री संस्थानमार्फत गरजू व साधूसंतांना वितरित करण्यात आली.
समाधी मंदिरात आराधना विधी
मुख्य दिवशी संध्याकाळी समाधी मंदिरात श्री साईबाबांच्या आराधना विधीने वातावरण प्रसन्न झाले. संस्थानच्या अध्यक्षा सौ. अंजू शेंडे (सोनटक्के) व श्री. प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते हा विधी पार पडला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांची पत्नी सौ. वंदना गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व सौ. वैशाली दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले व सौ. स्मिता भोसले, मुख्य लेखाधिकारी सौ. मंगला वराडे, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात तसेच संस्थानचे अधिकारी, पुजारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आराधना विधीमध्ये साईभजन, कीर्तन व सामूहिक नामस्मरणाचा समावेश होता. विधीनंतर समाधीसमोर आरती घेण्यात आली. साईनाथाच्या चरणी नतमस्तक होत भक्तांनी मनोभावे प्रार्थना केली की, जगातील दुःख-दरिद्र्य नष्ट होऊन सर्वत्र शांतता व ऐक्य नांदो.
🌸 दैनिक साईदर्शन परिवाराकडून सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸