कोल्हार बु॥ (प्रतिनिधी) –
राहाता तालुक्यातील कोल्हार बु॥ येथे दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.50 या वेळेत तब्बल 150 ते 200 आंदोलनकर्त्यांनी बेपरवानपणे महामार्ग अडवून रास्तारोको आंदोलन केल्याने वाहतूक पूर्ण ठप्प झाली. पोलिसांच्या वारंवार इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाच्या आदेशाचा भंग केल्याने या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल बाबाजी फटांगरे (ब.क्र. 1862) यांनी सरकारतर्फे गुन्हा दाखल केला आहे.
🔹 पार्श्वभूमी : आत्महत्येचा धक्कादायक प्रकार
दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी, गळनिंब येथील 16 वर्षीय अनिकेत सोमनाथ वडीतके हा स्वतःच्या मालवाहू गाडीतून गाई घेऊन जात असताना काही युवकांनी त्यास पकडून शिवीगाळ, दमदाटी करून त्याचा फोटो व बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर (इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप) टाकला होता. या अपमानामुळे अनिकेतने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात अमोल मोहन वडीतके यांच्या फिर्यादीवरून दिनेश राकेचा, प्रशांत राकेचा, संकेत खर्डे, सौरभ लहामगे (सर्व रा. कोल्हार बु॥) यांच्याविरुद्ध गुन्हा रजि. क्र. 582/2025 (बी.एन.एस. कलम 107) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🔹 आंदोलनाची पूर्वसूचना आणि पोलिसांचा इशारा
आरोपींना अटक करावी या मागणीसाठी यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख विजय अशोक तमनर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी दि. 30 ऑक्टोबर 2025 रोजी लोणी पोलिस ठाण्यात निवेदन दिले होते. यात त्यांनी दि. 31 ऑक्टोबर रोजी बेलापुर चौक, कोल्हार बु॥ येथे रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे नमूद केले होते.
त्यावरून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समज देऊन, “सदर प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू असून रास्तारोकोमुळे नागरिकांना त्रास होईल, त्यामुळे आंदोलन टाळावे,” असा इशारा दिला. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. अमोल भारती यांच्या उपस्थितीत निवेदनकर्त्यांशी चर्चा झाली होती. मात्र आंदोलनकर्त्यांनी इशारा न जुमानता आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला.
🔹 आंदोलनाचा गोंधळ आणि वाहतूक ठप्प
दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वा. आंदोलनकर्ते बेलापुर चौकात जमा झाले. त्यांनी अहिल्यानगर–मनमाड महामार्ग, कोल्हार–बेलापुर मार्ग आणि कोल्हार–राजुरी मार्ग यावर बसून प्रवासी वाहने व मालवाहतूक वाहनांना अडवले.
लाऊडस्पीकरवरून “पोलीस प्रशासनाचा निषेध आहे!” अशा घोषणा देत रस्ता रोखून धरला. यावेळी नेतेमंडळी म्हणून विजय तमनर, संतोष चोळके, सुनिल शिंदे, शिवाजी चिंधे, दीपक बोहाडे, शाम जाधव, बाळासाहेब जाधव, रंगनाथ तमनर आदींसह सुमारे १५० ते २०० आंदोलनकर्ते उपस्थित होते.
🔹 पोलिसांची तयारी आणि कारवाई
आंदोलनापूर्वीच प्रभारी अधिकारी श्री. वाघ यांनी वरिष्ठांना कळवून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
घटनेदरम्यान व्हिडिओ चित्रीकरण ज्ञानेश्वर तुपे (रा. बाभळेश्वर) यांच्या मार्फत करण्यात आले. पोलिसांनी आंदोलनातील वक्त्यांचे व नेत्यांचे फोटो व व्हिडिओ पुरावे संकलित केले आहेत.
सदर आंदोलन हे परवानगीशिवाय आणि जिल्हाधिकारी व पोलिस आदेशाचा भंग करून झाले असल्याने संबंधितांवर भारतीय न्याय संहिता कलम 126(2), 189(1), 223 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3)/135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔹 वाहतूक कोंडी आणि नागरिकांचा त्रास
सुमारे एक तासाहून अधिक काळ महामार्ग ठप्प राहिल्याने प्रवासी व भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
शिर्डी–अहिल्यानगर मार्गावरील ही वाहतूक कोंडी पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने सुरळीत केली.
या घटनेनंतर नागरिक व प्रवासी वर्गात तीव्र नाराजी असून, “भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांनी अशा आंदोलनांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी होत आहे.
— साईदर्शन न्यूज, राहाता 📰