सावळी विहीर (ता. राहाता) – नगर–मनमाड महामार्गावरील भारत पेट्रोलियम आर.जे. फ्युल्स या पेट्रोल पंपावर चालक व कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांशी अरेरावी, दमदाटी, काळाबाजार आणि वाहतूक कोंडीचे प्रकार सुरू असल्याने नागरिक आणि साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात सोमेश्वर शिवाजी आगलावे या सुज्ञ नागरिकांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
🚗 दररोजची कोंडी, अपघाताचा धोका
महामार्गावर वाहतूक कोंडी वाढल्याने नागरिक आणि साईभक्तांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ट्राफिक नियंत्रणाचा पूर्ण अभाव असून, नागरिकांनी प्रशासनाकडे कडक उपाययोजनांची मागणी केली आहे.
⚠️ “वशिल्याने सीएनजी भरतात, नियमभंग उघड” — तक्रारदार
तक्रारदारांच्या मते, पंप चालक व त्याची मुले ग्राहकांशी अरेरावी करतात तसेच “वशिल्याने” काही गाड्या मध्येच घुसवून सीएनजी भरतात. या प्रकारातून खुलेआम काळाबाजार आणि नियमभंग सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
🙏 साईभक्त दाम्पत्यावर हल्ला — दहशतीचं वातावरण
२५ ऑक्टोबर २०२५ रोजी अनियमिततेविरोधात आवाज उठवणाऱ्या एका साईभक्तास व त्याच्या पत्नीला मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची नोंद शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये झाली असून, घटनेनंतर परिसरात तीव्र नाराजी व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
⚖️ गुन्हा व तपासणीची मागणी
तक्रारीत संबंधितांवर भादवी कलम ३२३, ५०४, ५०६, १८८ तसेच मोटार वाहन कायदा कलम १२२(अ) व १२६ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, सीएनजी व पेट्रोल विक्री तपासून काळाबाजार सिद्ध झाल्यास पंपाचा परवाना निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
🅿️ चार एकर वावर असूनही पार्किंग नाही!
संबंधित पेट्रोल पंप चालकाकडे पंप परिसराशेजारी सुमारे चार एकर क्षेत्र उपलब्ध असून, त्याने त्या स्वतःच्या वावरात ग्राहकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
स्थानिकांनी या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्याची व ट्राफिक नियंत्रण फलक लावण्याची मागणी केली आहे.
👮 पोलीसांकडून ‘चॅप्टर केस’ दाखल
दरम्यान, पोलिस प्रशासनाने तक्रारीची दखल घेतली असून, प्राथमिक कार्यवाही सुरू केली आहे.
महिलेस मारहाण प्रकरणी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन ‘चॅप्टर केस’ दाखल केल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजित गलांडे यांनी दैनिक साईदर्शन शी बोलताना दिली आहे.
