अहिल्यानगर, दि. १६ :—
येसगाव–कोपरगाव परिसरात ५ आणि १० नोव्हेंबर रोजी नरभक्षक बिबट्याने दोन निरपराध नागरिकांचा बळी घेतल्याने भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रशासनाकडून तातडीची कारवाई न झाल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी अहिल्यानगर–मनमाड महामार्गावर रास्ता रोको करून जोरदार आंदोलन छेडलं होतं.
या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवण्यात आली. सलग दोन हल्ल्यांमुळे शोधमोहीम अत्यंत आव्हानात्मक होती; मात्र टाकळी आश्रमशाळेमागील परिसरात हालचाल दिसताच कोपरगाव वनपरिक्षेत्राचे पथक आणि शार्पशूटर टीम अलर्ट झाली.
रात्री ९.४५ वाजता शार्पशूटर राजीव शिंदे यांच्या टीमने अचूक गोळी झाडून नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करत ग्रामस्थांना दिलासा मिळवून दिला. अंदाजे ५–६ वर्षांचा नर बिबट मृत अवस्थेत मिळून त्याचे अवकाशात शवविच्छेदनासाठी बारागाव नांदूर रोपवाटिकेत हलवण्यात आले.
ही मोहीम मुख्य वनसंरक्षक (प्रा) मल्लिकार्जुन, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे, सुनील साळुंके, सागर केदार, सुभाष सांगळे, वाघूलकर, आणि रेस्क्यू अँड एनिमल सपोर्ट टीमचे विशेष योगदान राहिले. कोपरगाव, राहुरी, संगमनेर वनपरिक्षेत्र आणि स्थानिक ग्रामस्थांनीही कारवाईत मोठी साथ दिली.