शिर्डी │ मध्यप्रदेशातील कथाकार प्रदीप मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “श्री साईबाबा देव आहेत का?” या प्रश्नाला त्यांनी होकारार्थी उत्तर देण्यास नकार दिला आणि त्यानंतर साईभक्त, शिवभक्त, आणि संतप्रेमी समाजात रोष पसरला आहे.
या संदर्भात समाजसेवक आणि कट्टर साईभक्त संजय बबुताई भास्करराव काळे यांनी थेट प्रहार करत मिश्रा यांना कठोर शब्दांत जाब विचारला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे —
“महाराष्ट्र ही साधू-संतांची आणि शिवभक्तांची भूमी आहे. येथे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, गजानन महाराज, साईबाबा यांचं अढळ स्थान आहे. या भूमीत द्वेषाला जागा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः सर्व धर्मांचा सन्मान केला आणि हा पुरोगामी महाराष्ट्र त्या परंपरेचा वारसा पुढे नेत आहे. मग कोण आहे हा कथाकार जो साईंच्या नावाने विष ओकतो?”
काळे म्हणाले —
“मी गेली पंचवीस वर्षे दर गुरुवारी पंधरा किलोमीटर पायी चालत साईंचं दर्शन घेतो. केदारनाथ धाम, बारा ज्योतिर्लिंग, चारधाम – हे सर्व केले आहेत. तरी माझ्या हृदयात साईंचं स्थान सर्वोच्च आहे. आणि जो साईंच्या भूमीत येऊन दर्शन घ्यायलाही तयार नाही, तो आध्यात्मिक नाही तर फक्त व्यवसायिक आहे!”
ते पुढे म्हणाले —
“धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवणारे मिश्रा हिंदू धर्माच्या मूळ शिकवणीलाच हरवले आहेत. श्री साईबाबांनी कधी स्वतःला देव म्हटले नाही, पण कोट्यवधी भक्तांनी अनुभवातून त्यांना देव मानले आहे. तो भक्तिभाव कोणालाही शिकवता येत नाही, तो अंतःकरणातून येतो. प्रदीप मिश्रा यांनी तो भाव हरवला आहे.”
काळे यांनी स्पष्ट इशारा दिला —
“शिर्डी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, राहुरी या भागाचा प्रत्येक श्वास साईंच्या नावाने चालतो. अर्धा जिल्हा साईंच्या कृपेने पोट भरतो. राज्यातील कोणताही मुख्यमंत्री, मंत्री असो – सर्वजण साई चरणी नतमस्तक होतात. मग या भूमीत येऊन साईंच्या नावाने विष ओकणाऱ्या कथाकारांचा महाराष्ट्र तिरस्कार करतो!”
ते म्हणाले —
“प्रदीप मिश्रा देव नाहीत! भक्तांनी त्यांच्या भ्रमातून बाहेर यावं. आमच्यासाठी श्री साईबाबा हेच खरे देव आहेत. धर्माचा बाजार मांडणारे, मंचावरून द्वेष पसरवणारे महाराष्ट्राच्या भूमीत कधीच टिकू शकत नाहीत. शिवभक्ती आणि श्रद्धा शिकायची असेल तर घराघरात शिवलिलामृत वाचणाऱ्या स्त्रियांच्या ओव्या ऐकाव्यात, न की मंचावरच्या ढोंगी कथाकारांकडून.”
काळे पुढे म्हणाले —
“साईंच्या मंदिरात जाऊन एक फुल अर्पण करायलाही ज्यांना अहंकार अडवतो, त्यांचं आध्यात्म संपलं आहे. साईबाबा हे करुणा, प्रेम आणि एकतेचं प्रतीक आहेत. त्यांचा अपमान म्हणजे मानवतेचा अपमान. महाराष्ट्रातील भक्त हे कधीच सहन करणार नाहीत.”
या तीव्र विधानानंतर शिर्डी परिसरात मिश्रा यांच्या विरोधात संतप्त चर्चा सुरू असून साईभक्तांतून एकच आवाज उठतोय —
“साईंचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही!”