
शिर्डी (प्रतिनिधी) इंस्टाग्राम वरील मेसेज वरून वाद निर्माण होऊन एका २४ वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात घडली असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यासंदर्भात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत राहता तालुक्यातील डो-हाळे येथील साईनाथ गोरक्षनाथ काकड व कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील रहिवाशी रूपाली संजय लोंढे हे एकमेकांना ओळखतात. ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुणे येथे राहत होते.
एके दिवशी साईनाथ काकडे याने रूपाली लोंढे हिच्या बहिणीला इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या साईटवरून मेसेज करत शिवीगाळ केली म्हणून रूपाली संजय लोंढे, अनिल संजय लोंढे, दिनेश विठ्ठल आसणे, पवन कैलास आसणे व राहुल अशोक चांदर यांनी शनिवार दिनांक १० मे २०२५ रोजी पुणे
येथे साईनाथ राहत असलेल्या घरी जाऊन त्याला बळजबरीने ओढून आपल्याकडे असलेल्या चार चाकी गाडीत टाकून कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे आणत अमानुषपणे मारहाण करत काहीतरी विषारी औषध पाजून साईनाथचा खून केला असल्याचा महेश गोरक्षनाथ काकडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २५१/२०२५ कलम १०३ (१), १४० (१), १८९ (२), १९१ (२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करत आहे.
यातील चार आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, कोपरगाव शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, भूषण हांडोरे यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली.