शिर्डी (दि. २) – साईनगरी शिर्डी ही नेहमीच भक्तिभाव, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा संगम राहिलेली आहे. याच भूमीवर गेल्या ४७ महिन्यांपासून मोठ्या एकादशी निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक साई हरी कीर्तन सोहळ्याला आता चौथ्या पर्वाची सुरुवात होत आहे. येत्या शुक्रवारी, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत शिर्डीतील साई निर्माण करिअर अकॅडमी, नांदुर्खी रोड येथे ४८ वा अखंड हरिनामाचा गजर रंगणार आहे.

या कीर्तन सेवेत समाज प्रबोधनकार ह.भ.प. कुमारी आरती ताई भुजबळ (नातेपुते, आळंदी) आपल्या उर्जित वाणीतून हरिनामाचा अमृतरस ओतणार आहेत. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधन, भक्तीभाव आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळणार आहे.
भक्तिमय सेवेला शिर्डीकरांचा पुढाकार
शिर्डीकर ग्रामस्थ आणि साईभक्तांच्या सामूहिक पुढाकारातून मागील ४७ महिन्यांपासून हा उपक्रम अखंड सुरू आहे. एकादशीच्या पवित्र दिवशी हरिनामाचा गजर घुमवून शिर्डीतील वातावरण पावन करण्याचे कार्य ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने हाती घेतले आहे. आता या प्रवासाला ४८ महिन्यांचा टप्पा पूर्ण होत आहे.
या कीर्तन सोहळ्यानंतर भाविकांसाठी खिचडी प्रसाद पंगतीचे आयोजनही करण्यात आले आहे. ग्रामस्थ, आयोजक मंडळी व भाविकांच्या सहकार्याने सर्व व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भक्तिरसात न्हाऊन निघणार साईनगरी
आषाढी एकादशीला आध्यात्मिक महत्त्व लाभलेले आहे. संत परंपरेतून आलेल्या या परंपरेला शिर्डीकरांनी नवीन उंची देत “साई हरी किर्तन सेवा” हा उपक्रम सुरु ठेवला आहे. दिवसरात्र सत्संग, हरिनाम आणि किर्तन यामुळे गावागावांतून भाविक शिर्डीकडे आकर्षित होत आहेत.
या सोहळ्याला शिर्डीकर ग्रामस्थ, सर्व साईभक्त तसेच श्रद्धावंतांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वागतोत्सुक
श्री विजयराव कोते पा, सर्व ग्रामस्थ व साईभक्त, शिर्डी.