
कोपरगाव | प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. सोमनाथ घार्गे यांच्या स्पष्ट आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव शहरात अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर मोठी कारवाई करत नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि दीपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, राहुल डोके, सतीश भवर, सुनील मालणकर व चालक भगवान धुळे यांचे पथक कोपरगाव शहरात पेट्रोलिंगसाठी रवाना करण्यात आले होते.
दरम्यान, कोपरगाव ते संजीवनी कॉलेज रोडवरील एका कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे काही इसम घरगुती व व्यवसायिक गॅस सिलिंडरमधून चारचाकी वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती पथकास मिळाली. याबाबत तात्काळ कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे सपोनि ज्ञानेश्वर सोनवणे यांना माहिती देऊन संयुक्त कारवाई करण्यात आली.
छापा टाकल्यानंतर घटनास्थळी अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले —
मनोज चंद्रकांत गिरमे (वय 45)
सिद्धार्थ संदीप गिरमे (वय 26)
दोघे रा. निवारा हौसिंग सोसायटी, कोपरगाव
मुज्जमिल जाकिर मन्यार (वय 22)
सद्दाम जाकिर मन्यार (वय 25)
दोघे रा. सिद्धार्थनगर, चांदवड, जि. नाशिक
फहिम हारून शेख (वय 30), रा. कोपरगाव
चौकशीत मनोज गिरमे याने कोणताही शासकीय परवाना नसताना स्वतःच्या मालकीच्या ठिकाणी गॅस रिफिलिंगचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची कबुली दिली.
🔥 जप्त मुद्देमाल
८ एच.पी. कंपनीचे गॅस टाकी (५ भरलेले, ३ रिकामे) – ₹22,000
१ इलेक्ट्रिक मोटार व गॅस पाईप – ₹15,000
१ इलेक्ट्रिक वजन काटा – ₹5,000
२ चारचाकी वाहने – ₹2,00,000
एकूण मुद्देमाल : ₹2,42,000
आरोपींनी ज्वलनशील पदार्थांबाबत कोणतीही सुरक्षितता न बाळगता गॅस रिफिलिंग करून स्वतःसह परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण केला होता. त्यामुळे आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 11/2026 भारतीय न्याय संहिता कलम 223 सह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव शहर पोलिसांनी संयुक्तपणे केली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

