
शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डीतील साई संगम सेवाभावी संस्था आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा शिबिराचे आयोजन केले जाते. रविवारी हॉटेल साई संगम येथे आयोजित केलेल्या तिसऱ्या शिबिराला शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात डोळ्यांच्या विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी करून तातडीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्यांची निवड करण्यात आली.
आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक तपासण्या, १५० शस्त्रक्रिया पूर्ण
साई संगम सेवाभावी संस्था व शंकरा आय हॉस्पिटलच्या उपक्रमातून आतापर्यंत जवळपास ४०० हून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १५० रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना नवे जीवन दिले आहे. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत नेत्रसेवेचा वसा
या उपक्रमामागील सूत्रधार आणि साई संगम सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी “समाजासाठी काहीतरी केले पाहिजे” हा निर्धार मनाशी बाळगून हा उपक्रम सुरू केला आहे. दर महिन्याला एक शिबिर या संकल्पनेतून आयोजित केले जाते. स्थानिक स्वयंसेवक आणि आरोग्य सेवक यांच्या मदतीने शिबिराचे आयोजन सुचारूपणे केले जाते.
गरजू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रियेची सुविधा
ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते, त्यांना नवी पनवेल येथील आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल येथे नेऊन पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णांच्या राहण्यापासून ते उपचारापर्यंत सर्व सुविधा विनामूल्य दिल्या जात असल्याने ग्रामीण भागातील व आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना नवे जीवन मिळत आहे.
समाधान व आवाहन – संदीप सोनवणे
“आजवरच्या शिबिरांतून शेकडो रुग्णांनी लाभ घेतला आहे. त्यांचे समाधान पाहून मलाही आनंद होतो. हा उपक्रम पुढेही असाच सुरू राहील. अधिकाधिक रुग्णांनी या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचा लाभ घ्यावा,” असे आवाहन संदीप सोनवणे यांनी केले.