शिर्डी (२९ सप्टेंबर २०२५):
साईबाबांच्या पवित्र पवनस्पर्शाने पुनीत झालेली शिर्डी ही जगभरातील साईभक्तांचे श्रद्धास्थान आहे. दररोज येथे लाखो भाविक समाधीचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतात. राष्ट्रपती, पंतप्रधान, विविध देशांतील मान्यवर, तसेच अनेक क्षेत्रातील अग्रणी व्यक्ती शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे आशीर्वाद घेतात.
आज राज्याचे मान्यवर मा. अॅड. श्री उज्ज्वल निकम, राज्यसभा खासदार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. सकाळच्या मंगल वातावरणात झालेल्या या दर्शनावेळी समाधी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. श्री निकम यांनी समाधीसमोर माथा टेकून श्री साईबाबांचे आशीर्वाद घेतले आणि काही वेळ मनोमन प्रार्थना केली.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी श्री संदीपकुमार भोसले यांनी त्यांचा औपचारिक सत्कार केला. या वेळी संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सत्कारावेळी श्री निकम यांनी साईबाबांच्या कार्याचे स्मरण करून शिर्डी ही केवळ महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देश-विदेशातील भाविकांसाठी अध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र असल्याचे सांगितले. त्यांनी संस्थानच्या सेवा व व्यवस्थापन कार्याची प्रशंसा केली.