
महंत रामगिरी महाराज यांनी एक वक्तव्य केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे महंत रामगिरी महाराज यांच्यावर टीका करण्यात येत आहे. याबाबत ईटीव्ही भारतशी बोलताना महंत रामगिरी महाराज यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. आपण जे बोललो, त्यावर ठाम आहोत. परिणामाची आपल्याला चिंता नाही, असं महंत रामगिरी महाराज यांनी ठणकावलं.
सिन्नर तालुक्यातील शहा पंचाळे इथं 177 वा गुरुराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. यावेळी प्रवचन करताना सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांनी वक्तव्य केल्यानं ते वादात सापडले आहेत. महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी मोर्चे काढून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आता महंत रामगिरी महाराजांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं ठणकावलं आहे. “बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू,बौद्ध, ख्रिश्चन, शीख समाजावर अत्याचार करण्यात येत आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांची तोडफोड करुन विटंबना केली जात आहे. हिंदू सहिष्णू आहे. मात्र याला सीमा आहे. अशा वेळप्रसंगी अन्याय सहन करता कामा नये. मी केलेल्या वक्तव्यावर ठाम असून त्याच्या परिणामाची आम्हाला चिंता नाही. गुन्हा दाखल झाला असला, तर ज्यावेळी मला नोटीस येईल, त्यावेळी काय करायचं ते पाहू,” अशा स्पष्ट शब्दात महंत रामगिरी महाराजांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.