गणेशोत्सवानिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छा फलक व त्यावर असलेले पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांचे फोटो असलेले बॅनर काही माथेफिरूंनी फाडल्याने शिर्डीत मोठा वादंग निर्माण झाला होता
येथील लक्ष्मीनगर भागातील संत रविदास गणेशोत्सव मंडळाने पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे,सुजय विखे व स्थानिक कार्यकर्त्यांचे फोटो असलेले बॅनर लावले होते . आज सकाळी सदर बॅनर फाडुन नासधूस व तेथे लावण्यात आलेल्या दुचाकीचे शिट फाडण्यात आल्याचे तेथील नागरीकांच्या निदर्शनास आले असता विखे समर्थकांचा शिर्डी पोलीस स्टेशन ला मोठा जमाव जमा झाला . घडलेल्या प्रकाराचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला .
माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, माजी नगरसेवक मंगेश त्रिभूवन, सुरेश आरणे यांनी आरोपिंना पकडण्याची मागणी केली व तसेच रविदास मंडळाचा विशाल अहिरे याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली .
घटनेचे गांभीर्य ओळखून शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी त्या भागात असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली असता पोलीसांचे डोके चक्रावले कारण जे फिर्यादी होते तेच बॅनर फाडताना दिसत होते . पोलिसांनी त्वरीत त्यांना ताब्यात घेतले असता
सदर प्रकार आम्हीच केला असून आमच्या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत दुसरे तरुण सामील झाल्याचा राग आल्याने सदर कृत्य आम्हीच केल्याची कबूली त्यांनी दिली आहे .
दरम्यान या घटनेचे लोण संपूर्ण जिल्ह्यात पसरताच वातावरण चांगलेच तापले होते परंतू शिर्डी पोलीसांच्या सतर्कते मुळे पुढील अनर्थ टळला आहे .
सदर घटनेस जबाबदार धरत रविदास मंडळाचे कार्यकर्त आरोपी विशाल अहिरे, करण अहिरे, दिनेश गोफणे, शिलावंत या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .