
शिर्डी (प्रतिनिधी) :-
साईबाबांचे संपूर्ण आयुष्य हे सेवाभाव, दानधर्म आणि प्रेमाचा अनमोल संदेश देणारे होते. त्यांनी स्वतः कधीही संपत्ती जमविली नाही, की वैभवाचा मोह केला नाही. उलट त्यांनी भिक्षा मागून आणलेल्या अन्नातून गरिबांना जेवू घातले, बेघरांना आसरा दिला आणि निराधारांना आधार दिला.
साईबाबा नेहमी म्हणत – “अन्नदान हेच श्रेष्ठ दान.” त्यांच्या दृष्टीने भुकेल्याला जेवू घालणे म्हणजेच देवाची खरी सेवा होती. तसेच त्यांनी “सबका मालिक एक” या शिकवणीद्वारे सर्वांना बंधुभाव आणि समतेचा संदेश दिला.
आज त्याच सेवाभावाचा वारसा श्री साईबाबा संस्थान प्रशासन पुढे नेत आहे. शिर्डी आणि परिसरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत. काहींच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने सामान नष्ट झाले, तर काहींना राहण्यासाठी सुरक्षित निवाऱ्याचीही सोय उरली नाही.
या परिस्थितीत श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने पुढाकार घेत गरजूंसाठी आधारवड उभा केला आहे. साई आश्रम क्रमांक दोन येथे नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. शेकडो नागरिकांना येथे सुरक्षित छत मिळाले असून, त्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
फक्त निवाऱाच नव्हे तर संस्थान प्रसादालय सर्वांसाठी खुले करून गरमागरम भोजन दिले जात आहे. पावसामुळे अडकलेल्या आणि अन्नाच्या अभावाला सामोरे जाणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा म्हणजे खरोखरच देवदूतासमान मदत ठरत आहे.
संस्थान प्रशासनाने आवाहन केले आहे की – “ज्या नागरिकांना अजूनही पावसामुळे गैरसोय भासत आहे, त्यांनी या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा. साईसेवा हीच आमची खरी पूजा आहे.”
साईबाबा नेहमी सांगायचे – “जो माझ्यावर श्रद्धा ठेवेल त्याचे मी ओझे वाहीन.” आज त्याच शिकवणीचा प्रत्यय नागरिकांना संस्थानाच्या सेवेमधून येत आहे.
भुकेल्याला अन्न, बेघराला आसरा, निराधाराला आधार आणि दुःखी माणसाला समाधान – हेच साईसेवेचे खरे ध्येय आहे. आज या सेवेमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. अनेकांचे अश्रू पुसले जात आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू खुलले आहे.
हेच साईंची खरी कृपा आणि त्यांचा वारसा – जो आज संस्थान आपल्या कार्यातून जिवंत ठेवत आहे.