
देशविदेशातून येणारे साईभक्त श्रद्धेने हार प्रसाद व पूजेचे साहित्य साईंच्या चरणी अर्पण करतात मात्र या सर्वं साहित्याच्या किंमती फिक्स नसल्याने अनेक दुकानदार व एजेंट भाविकांच्या भोळेपणाचा फायदा घेत अव्वा ते सव्वा भावात त्यांना विक्री करत होते, यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट होती तर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.

याची दखल घेत शिर्डी नगर परिषद व साई संस्थान प्रशासनाने यासर्व दुकानदारांना वस्तूंचे भाव, दर्जा तसेच प्रसादाच्या प्रत्येक पाकिटावर किंमत टाकणे सक्तीचे केले असून हे फिक्स रेट चे फ्लेक्स बोर्ड प्रत्येकाने लावणे बंधनकारक केले व त्याची अंमलबजावणी पंधरा जुलै पासून लागू केली.
परंतु काही आपाप्रवृतीच्या एजेंट व दुकानदारांनी हे नियम धाब्यावर बसवत हैद्राबाद येथील सॉफ्टवेयर इंजिनियर वरुण जेस्टा हे सहकुटुंब साई दर्शनाला शिर्डीत आल्यावर त्यांना विशाल विश्वनाथ गांगुर्डे या एजेंटने झटपट दर्शनाचे खोटे आमिष दाखवत बंटी गोंदकर यांच्या हार प्रसादाच्या दुकानावर घेऊन गेला.
त्याठिकाणी या भाविकाकडून कुठलेही बिल नदेता प्रसादाच्या नावाखाली सोळाशे रुपये घेण्यात आले व झटपट दर्शनाच्या नावाखाली बाराशे रुपये विशाल गांगुर्डे या एजेंटने घेतले. नंतर आज गर्दी कमी आहे व तुम्ही दर्शनरांगेतून जा असे सांगून तो एजेंट निघून गेला. परंतु आपली आर्थिक फसवणूक झाल्याच वरुण जेस्टा यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मंदिर पोलीस स्टेशनमध्ये सदर घटना सांगितली.
याची गंभीर दखल घेत सदर भाविकाला शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले व तिथे साई दर्शन शॉपचे मालक बंटी गोंदकर व विशाल गांगुर्डे यांच्या विरोधात फिर्याद दिली त्यानुसार शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी तात्काळ फिर्याद दाखल करून सदर दोनही आरोपिंच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 318 (4) प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल केला
व आरोपी विशाल गांगुर्डे याला ताब्यात घेतले तर हारप्रसाद दुकान मालक आरोपी बंटी गोंदकर मोबाईल बंद करून पसार झाला.
शिर्डी ग्रामस्थांनी व डॉ सुजय विखे पाटील यांनी सातत्याने भाविकांची फसवणूक होऊ नये म्हणून अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले परंतु तोंडाला रक्त लागलेले एजेंट व दुकान मालक यांच्या बेशिस्तीमुळे भाविकांची लुट व फसवणूकीचे प्रकार सुरूच असून यामुळे देशपातळीवर शिर्डीची बदनामी होत आहे.
आता शिर्डी नगरपरिषद व साई संस्थान प्रशासन कोणती भुमिका घेते हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
कोट – जर हारप्रसाद दुकानदार व पॉलिशवाले यांनी शिर्डी नगरपरिषद व साई संस्थांनने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केले तर डॉ सुजय विखे पाटील यांना सांगून कठोर निर्णय घ्यावा लागेल.