
शिर्डी : कर्नाटकेचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं होतं. कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदीवर मीच कायम राहणार आहे, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ठाणकावलं होतं. त्यांच्या विधानावर आता उपमुख्यमंत्री डि के शिवकुमार यांनी पलटवार केला आहे. “मुख्यमंत्री पदाच्या निर्णयाची योग्य वेळ आली,

की हायकमांड त्याबाबत निर्णय घेतील. हा विषय माध्यमांशी चर्चेचा नाही,” अशी ठाम भूमिका कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी के शिवकुमार यांनी शिर्डी इथं घेतली. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी सपत्नीक आलेल्या डि के शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलांच्या चर्चांवर मोठ्ठं विधान केलं आहे.
शिवकुमार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, “सध्या आमचं पूर्ण लक्ष 2028 च्या निवडणुकांकडं आहे. काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी असलेल्या संबंधांचा उल्लेख न करता पक्षातील शिस्त आणि हायकमांडच्या निर्णय प्रक्रियेवर विश्वास असल्याचं दर्शवलं. डी के शिवकुमार यांनी काँग्रेस पक्षाच्या नव्या धोरणावरही भाष्य केलं.
“संपूर्ण देशभर काँग्रेस पक्ष नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना संधी देत आहे. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष यांसारख्या जबाबदाऱ्या नव्या पिढीकडं सोपवल्या जात आहेत. देशात काँग्रेसची नव्यानं उभारणी करणं ही काळाची गरज आहे. यासाठी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रभावी नियोजन सुरू केलं आहे,
असं त्यांनी नमूद केलं.अनेक दिवसांपासून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याची इच्छा होती. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच दर्शन घेण्याचा विचार होता. मात्र त्या दिवशी भाविकांची खूप गर्दी असल्यानं आज दर्शनासाठी आलो. साई संस्थानकडून दर्शन व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केली जाते. भाविक आनंदानं साईबाबाचं दर्शन घेतात, हे पाहून समाधान वाटते,
असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केलं. डि के शिवकुमार आज आपल्या पत्नीसमवेत शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी यावेळी साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. दुपारच्या मध्यान्ह आरतीतही ते सहभागी झाले.
यावेळी साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी उपमुख्यमंत्री डि के शिवकुमार आणि त्यांच्या पत्नीचा शाल, साईमूर्ती देऊन सत्कार केला.यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते.