आता मी राहत्यामध्येच जाऊन बसणार आहे असे सांगत खा. नीलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना शनिवारी वाडेगव्हाण येथून थेट आव्हान दिले. वाडेगव्हाणच्या मेळाव्यात बोलताना खा. लंके म्हणाले, कालच मी पवार साहेबांना सांगितलंय की राहत्याचा निर्णय लवकर घ्या आणि माझ्यावर जबाबदारी देऊन टाका. मी करतो काय करायचे ते. तुम्हाला साखरेत मळले, घोळले तरी तुमचे वाकडं ते वाकडंच. आमच्या शेपटावर पाय दिला तर मलाही नीलेश लंके म्हणतात असे सांगत लंके यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले.
वाडेगव्हाण गटाच्या वतीने आयोजित नागरी सत्कारास उत्तर देताना खा. नीलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, मा. खा. डॉ. सुजय विखे यांच्यावर जोरदार शरसंधान केले.
यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, निवडणूक आयोगाकडे अर्ज करून मशिनची फेरतपासणी करण्यासाठी १८ लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. तज्ञांच्या मते मतदान मशिनमध्ये काहीही फेरफार होणार नाही. असे झाले तर संपूर्ण देशातील निवडणूकीवर संशय घेतला जाईल. काल परवा उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. अहो, तुमचे वडील असतील,आजोबा असतील इथे नीलेश लंके आहे. म्हणूनच तुमची जिरवली. माझ्याकडे कारखाना नाही, शिक्षण संस्था नाही, बुध्दी आहे म्हणून तर जिरवली ना ? खरे तर आपण हरकत घ्यायला हवी होती. चोराच्या उलटया बोंबा यालाच म्हणतात. लोकांनी जिरवली तर आता आमच्या चुका झाल्या, आम्ही कमी पडलो, आता आपण सुधरून वागले पाहिजे. पण एखाद्याचं शेपट वाकडं ते वाकडंच असतं असे सांगत खा. लंके यांनी विखे पिता पुत्रांवर जोरदार टीका केली.
DN SPORTS