
शिर्डी, दि. ३ –
साईबाबा समाधी मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडवणूक, दिशाभूल व आर्थिक पिळवणूक करणाऱ्या एजंटांविरोधात अखेर प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. भाविकांची वाहने अडवून त्यांना खासगी पार्किंग, विशिष्ट दुकानांतून पूजासाहित्य खरेदी किंवा निवासासाठी भाग पाडणाऱ्या दलालांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १५२ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असून, याबाबतचे सशर्त आदेश शिर्डी विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत.,,,,,,,,
दररोज देश-विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिर परिसर व शहरातील प्रवेश मार्गांवर काही खासगी व्यक्ती व एजंटांकडून सार्वजनिक रस्त्यावरच भाविकांची वाहने बेकायदेशीरपणे थांबवून त्यांना दिशाभूल केली जाते. “इथेच पार्किंग करा”, “याच दुकानातून पूजासाहित्य घ्या”, “इथेच राहण्याची सोय करा” अशा प्रकारे अव्वाच्या सव्वा दरात जबरदस्तीची खरेदी करून भाविकांची सर्रास लूट होत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्रशासनाकडे येत होत्या. अनेक ठिकाणी दमदाटी, शिवीगाळ व धक्काबुक्कीचे प्रकारही उघडकीस आले आहेत.
या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने स्पष्ट आदेश जारी करत भाविकांची अडवणूक, दिशाभूल व मध्यस्थीचे सर्व प्रकार बेकायदेशीर ठरवले आहेत. आदेशानुसार शिर्डी गावाच्या बाहेरील किंवा आतल्या कोणत्याही सार्वजनिक रस्ते, चौक, बसस्थानक किंवा प्रवेश मार्गावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने थांबवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
तसेच कोणत्याही व्यक्तीने स्वतःला साईबाबा संस्थान, देवस्थान ट्रस्ट किंवा प्रशासनाचा प्रतिनिधी असल्याचे भासवू नये, असेही आदेशात ठामपणे नमूद करण्यात आले आहे. भोजन, निवास, पार्किंग किंवा दर्शनाच्या नावाखाली दलाली व मध्यस्थी करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे.
या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम २२३ अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे. संबंधित आदेशामुळे प्रभावित झालेल्या व्यक्तींना १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे.
🔴 भाविकांच्या श्रद्धेवर डल्ला मारणाऱ्यांना आता माफी नाही, असा थेट संदेश प्रशासनाने दिला असून, शिर्डीत दलालगिरीला आळा बसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

