शिर्डी (प्रतिनिधी) —
शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेला औपचारिक सुरुवात झाली असून, नगरपरिषद कार्यालयात आज पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
🧾 आवश्यक दाखले मिळवण्यासाठी उमेदवारांची लगबग
उमेदवारी अर्जासोबत जोडायचे असणारे विविध ‘ना हरकत दाखले’ घेण्यासाठी नगरपरिषदेत मोठी गर्दी दिसून आली. उमेदवारांनी पालिकेचा मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच इतर अनुषंगिक करांचा भरणा करून ‘नील दाखले’ मिळवले. त्यासोबतच उमेदवारी अर्ज करताना स्वतःच्या घरात शौचालय असल्याचा दाखला आणि पालिका किंवा शासनाचे ठेकेदार नसल्याचा दाखला घेणे अनिवार्य असल्याने, या कागदपत्रांसाठीही उमेदवारांची धावपळ सुरू होती.
📄 कागदपत्रांची जुळवाजुळ करण्यातच गेला पहिला दिवस
निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळ करण्यातच उमेदवारांचा पहिला दिवस गेला. बहुतांश उमेदवार विविध खात्यांतून दाखले मिळवण्यात गुंतले असल्याने प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल न होण्याची नोंद झाली.
🏛️ प्रशासकीय यंत्रणा सज्ज — अधिकारींच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया सुरू
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राशीनकर अधिकारी नियुक्त असून, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अमोल मोरे आणि मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गती वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.