
बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू लवकरच तुरुंगातून बाहेर येणार आहे. न्यायालयाने आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. नुकतेच आजारी असलेल्या आसारामला महाराष्ट्रात उपचारासाठी नेण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूला वैद्यकीय कारणास्तव 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर केला असला तरी या काळात कडक अटीही लागू असतील. जामिनाच्या कालावधीत आसाराम बापूंला त्यांच्या अनुयायांना भेटता येणार नाही.
आसाराम बापूला 31 ऑगस्ट 2013 रोजी जोधपूर पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अटक केली होती आणि तेव्हापासून ते तुरुंगात आहे. जोधपूरजवळील मनाई गावात असलेल्या त्याच्या आश्रमात एका किशोरवयीन मुलीने त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील रहिवासी असलेली ही मुलगी आश्रमात विद्यार्थिनी होती. पीडितेसोबत बलात्काराची घटना 2001 ते 2006 दरम्यान घडली होती. आसाराम गेल्या साडेअकरा वर्षांपासून तुरुंगात आहेत.