अहिल्यानगर | दि. २६
जिल्ह्यातील ११ नगरपरिषद आणि १ नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ व ३६ अंतर्गत ३ डिसेंबर २०२५ पर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.
जामखेड, कोपरगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा, श्रीरामपूर तसेच नेवासा नगरपंचायतीत २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होत असून, शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा आदेश लागू करण्यात आला आहे.
मनाई आदेशानुसार मिरवणुका, रॅली, सभा किंवा कोणताही जमाव नेमून दिलेल्या मार्ग व वेळेतच काढावा. ठरवलेल्या मार्गाव्यतिरिक्त मिरवणूक नेणे, सार्वजनिक रस्त्यांवर अनावश्यक गर्दी किंवा गैरशिस्तीचे प्रकार करण्यास सक्त मनाई आहे.
प्रार्थना स्थळांच्या आसपास प्रार्थनेच्या वेळेत कोणताही गोंधळ, ध्वनी, अडथळा किंवा बेशिस्त वर्तन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जत्रा, घाट, देवळे, मशिदी, दर्गे, सार्वजनिक घरे व मार्गांवरही गैरव्यवहारास मनाई आहे.
याशिवाय परवानगीविना वाद्य वाजवणे, कर्कश ध्वनीक्षेपकांचा वापर, गाणी, ढोल-ताशे वाजवणे पूर्णत: बंदीस्त आहे.
विशेष प्रसंगी सवलत हवी असल्यास संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी परिस्थितीनुसार परवानगी देऊ शकतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.