
कोपरगाव प्रतिनिधी- शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक, लाथाबुक्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून
सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा राज्य पत्रकार संघ कोपरगाव तालुका व शहर तसेच तालुक्यातील पत्रकारांनी कोपरगावचे तहसिलदार तसेच कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस निरीक्षक यांना निवेदन देत निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.
सदर निवेदन देते प्रसंगी, तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप, शहराध्यक्ष हफीज शेख, उपशहराध्यक्ष स्वप्नील कोपरे, सचिव विजय कापसे, कार्याध्यक्ष बिपीन गायकवाड, संतोष जाधव, सोमनाथ सोनपसारे, विनोद जवरे, सोमनाथ डफळ, काका खर्डे, रवी जगताप, रवी वाघडकर, विशाल लोंढे, संजय लाड,दिपक जाधव आदी पत्रकारांनी निवेदन दिले.
या निवेदनात म्हटलें आहे की,पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी, चौथ्या स्तंभावर घाला घालणारी गंभीर बाब आहे. पत्रकार समाजातील सत्य घटनांचा आवाज बनतात. अन्याय, भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतात. अशा व्यक्तींवर होणारे हल्ले ही अत्यंत निंदनीय व असह्य बाब आहे.

त्यामुळे आपण सदर प्रकरणातील सर्व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलावी, राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात,भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस व प्रभावी धोरण आखावे अशी मागणी निवेदन देत शासनाकडे केली आहे.