राजकोट (गुजरात) प्रतिनिधी:
“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली, तोच साधू ओळखावा; देव तेथंच जाणावा” या संतवचनाप्रमाणे आई- वडिलांचा सन्मान करणे, त्यांचे संगोपन करणे व त्यांना आयुष्याच्या संध्याकाळी प्रेमाने जपणे हे खरे पुण्य मानले जाते.
हे पुण्य कार्य देशातील गुजरात राज्याच्या राजकोट जिल्ह्यातील गोंडल तालुक्याच्या चेरखडी या गावात उभारलेल्या तिरंगा जय भगवान वृद्धाश्रमात होत असल्याचे प्रतिपादन एन.के.टी. ग्रुपचे अध्यक्ष, नामवंत उद्योगपती व ज्येष्ठ समाजसेवक नानजीभाई खिमजीभाई ठक्कर (ठाणावाला) यांनी केले.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य:
या सोहळ्यात माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. चंद्रकांत महाराज डुंबरे, एन.के.टी. ग्रुपचे सचिव नटवरलाल ठक्कर,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अत्याधुनिक सुविधांनी सज्ज:
हा वृद्धाश्रम केवळ आश्रयस्थान नसून आधुनिक जीवनशैलीचा अनुभव देणारे आदर्श केंद्र ठरले आहे. येथे प्रत्येक खोलीत एअर कंडिशन, गरम पाण्याची सोय, वॉटर प्युरिफायर, एलईडी टीव्ही, वाचनालय, मनोरंजनासाठी विविध खेळ, स्विमिंग पूल यांसह व्हीआयपी दर्जाचे जेवणाची व्यवस्था आहे.
उजाड रानावर तब्बल १५ एकर जागेत उभारलेला हा आश्रम आज गावकुसापासून शहरापर्यंत आदर्श मानला जात आहे.
वृद्धांचे अनुभव – घराची
ऊब आणि मायेची सावली:
या आश्रमात राहणाऱ्या अनेक वृद्धांनी आपापल्या भावना व्यक्त करताना डोळ्यांतून अश्रू दाटून आले. त्यांनी अत्यंत हळुवार पण हृदयस्पर्शी शब्दांत आपले अनुभव मांडले.
एक वृद्ध आई म्हणाली –
“आम्ही जन्म दिलेल्या मुलांनी आमची कदर केली नाही. आयुष्यभर त्यांच्यासाठी घाम गाळला, कष्ट केले, पण वृद्धापकाळी त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली. आयुष्याच्या या टप्प्यावर मुलांकडून जी साथ, आधार आणि माया मिळायला हवी होती, ती न मिळाल्याने मनात खूप वेदना आहेत. मात्र, या आश्रमात आल्यापासून आम्हाला आपुलकीची खरी माया मिळाली आहे. या वृद्धाश्रमाचे सेवक आम्हाला लेकरांसारखे जपतात. रोजच्या व्यवहारात, जेवणखाण्यात, औषधोपचारात इतकी काळजी घेतात की, आम्हालाही वाटतं – ही आपली खरी लेकरं आहेत.”
दुसरे एक वयोवृद्ध गृहस्थ म्हणाले –
“घरात आम्हाला कधी मिळाल्या नाहीत अशा सुविधा व सोयी येथे उपलब्ध आहेत. खोलीत एअर कंडिशन आहे, गरम पाण्याची सोय आहे, रोज स्वच्छ आणि पौष्टिक जेवण मिळतं, वाचनालय आहे, खेळ आहेत. एवढंच नाही तर एखाद्या सणासुदीच्या दिवशी इथल्या उत्सवांत मिळणारी आपुलकी आणि आनंद आम्हाला घरापेक्षा अधिक सुखावणारा असतो.”
तर आणखी एक वृद्ध आजी डोळ्यांत आनंदाश्रू आणून म्हणाल्या –
“या आश्रमाने आम्हाला फक्त राहण्याची सोय दिली नाही, तर घराची ऊब आणि मायेचे वातावरण दिलं आहे. येथे राहून आमच्या आयुष्याला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाल्यासारखं वाटतं. जे मूल दुरावले, त्याची उणीव या सेवकांनी त्यांच्या प्रेमळ वागणुकीने भरून काढली.”
वृद्धांचे हे अनुभव ऐकताना संपूर्ण सभागृहातील वातावरण भारावून गेले. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि डोळ्यांत चमकणारे आनंदाश्रू पाहून, हा आश्रम खरंच त्यांच्यासाठी मायेचा संसार ठरतो आहे हे स्पष्ट झाले.
नानजीभाई ठक्कर यांचे हृदयस्पर्शी मनोगत:
या प्रसंगी आपल्या भावनिक शब्दांत नानजीभाई ठक्कर म्हणाले –
“या ठिकाणी येताना मला जीवनाचा खरा आनंद मिळतो. इथे आलेल्या मायमाऊलींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की, आपल्याला खरं तर कुठे सेवा करावी याचं भान येतं. जेव्हा वृद्ध मातांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचा आणि आनंदाचा अश्रू चमकतो, तेव्हा मला वाटतं की हीच खरी पूजा, हा खरा धर्म.
माझ्यासाठी प्रत्येक भेट ही विशेष असते. आश्रमाच्या दारात पाऊल टाकताच मला माहेरवाशीण मुलीच्या स्वागतासारखी उबदार मिठी मिळते. इथल्या मातांच्या मनातली माया, त्यांचे शब्द, त्यांचे आशिर्वाद हे माझ्यासाठी अनमोल आहेत.